Apmc Election : भंडारा जिल्हाच्या तुमसर-मोहाडी या श्रीमंत बाजार समितीची निवडणूक 12 मे रोजी होत आहे. त्यासाठी तीन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाजार समितीची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम मानली जात आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत गटातटाचे राजकारण दिसत आहे. येथे राजकीय पक्ष, आपला नेता व विचारसरणी दूर ठेवून सोयीनुसार उमेदवारांनी पॅनलची निवड केली आहे. येथे तीनही पॅनल मध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या सोयीनुसार शिरकाव करून संचालक होण्याकरिता धडपड करीत आहेत.
Lok Sabha Election : सारखी नावे असलेल्या उमेदवारांवर बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार
तीन पॅनल शिवाय काही प्रभावशील अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सध्या मतदारांच्या भेटी घेणे व भ्रमणध्वनीवर संपर्क साधला जात आहे. बाजार समितीचे माजी संचालक या निवडणुकीच्या मैदानात पुन्हा आपले नशीब आजमावित आहेत. त्यांना निवडणूक कशी जिंकावी याचे समीकरण माहित आहे. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार असे दिसते.
तुमसर- मोहाडी ही बाजार समिती पूर्व विदर्भात तसेच राज्यात धान व तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीच्या निवडणुकीकडे राजकीय नेते व राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. राजकारणाचे प्रवेश द्वार म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. सहकार क्षेत्रामध्ये या निवडणुकीला अन्यसाधारण महत्त्व आहे. ही श्रीमंत बाजार समिती असून कोट्यावधीचा नफा दरवर्षी या बाजार समितीला होतो. त्यामुळेही निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.