Word Of Threat : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नवनीत राणा यांना पत्राद्वारे दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आली आहे. या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खळबळ उडाली
धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. पत्रात आमिर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. राणा यांच्या घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर रोजी अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक (PA) विनोद गुहे यांनी तक्रार दिली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजेल. त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
दाम्पत्याची तयारी
अमरावतीच्या माजी खासदार आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी देखील निवडणुकीची तयारी केली आहे. अशातच राणांना धमकीचं पत्रं आलं आहे. पत्रानंतरही राणा यांनी काम सुरुच ठेवलं आहे. राणा दाम्पत्याने नवरात्र निमित्ताने त्यांच्या गंगासावित्री निवास्थानापासून अंबादेवी, एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पदयात्रा काढली. राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अंबा देवीला साकडं घालण्यासाठी पदयात्रा काढत असतात.
राणा दाम्पत्यानं शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, बेरोजगार यांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती यावी, यासाठी देवीकडे साकडं घातलं. पत्रात नवनीत राणांचे पती रवी राणा यांच्याविषयी वादग्रस्त शब्दाचा वापर करण्यात आला आहे. पत्र पाठविणाऱ्या आमिरने आपण हैदराबादचे असल्याचे नमूद केले आहे. आपण कोणत्याही राजीकय पक्षाचे नाही, असा उल्लेख आहे. आपला भाऊ वसीम याने दुबईतून कॉल केला होता. मात्र फोन उचलला नाही, असे पत्रात नमूद आहे. पत्रात फोन नंबरचा देखील उल्लेख आहे. पाकिस्तान जिंदाबाद असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.
आपल्या पत्नीने हे पत्र लिहिल्याचा उल्लेख आमिरने केला आहे. या पत्राबाबत नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. आपण गेल्यावर्षी अंबादेवीला साकडं घातलं होतं. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान व्हावे, अशी प्रार्थना केली होती. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आहेत. यावर्षी रवी राणा हे चवथ्यांदा बडनेरा मतदारसंघातून विजयी व्हावे, अशी प्रार्थना केली आहे. राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे, असं देवीला सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महायुतीचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी अंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली आहे.