Social Media Post : मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी एकाला थेट मारण्याची धमकीच दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर अतिशय खालच्या पातळीवर एकाने टीका केल्यानंतर हा प्रकार घडला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये वादाचा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाची ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जुन लोणारे यांनी केला आहे. जाहीरपणे खालच्या पातळीवर टीका केल्याने जाब विचारल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी म्हटले आहे.
अर्जुन लोणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर टीका केली. ही टीका करताना काही अपशब्दांचा वापर करण्यात आला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केला. त्यानंतर अर्जुन लोणारे यांनी मूर्तिजापूर शहरातील रस्त्यांवरून प्रश्न उपस्थित केले. कामात भ्रष्टाचार झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे संतप्त झालेले भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी भ्रमणध्वनीवरून अर्जुन लोणारे यांच्याशी संपर्क साधला. लोणारे आणि आमदार पिंपळे यांच्यात फोनवरून बोलणे सुरू असताना वाद झाला.
पिंपळे म्हणाले..
आमदार हरीश पिंपळे यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा करताना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जुन लोणारे यांनी केला. यासंदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधला. मात्र निरीक्षकांनी पोलिस स्टेशनला येऊन भाजप पदाधिकाऱ्यांची माफी मागा. आपण कोणतीही तक्रार घेणार नाही, असे पोलिसांनी सांगितल्याचे लोणारे म्हणाले. यावर लोणारे यांनी माफी मागण्यास नकार दिला. अर्जुन लोणारे यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर टीका केली. त्यामुळेच आपण त्यांना जाब विचारल्याचे आमदार हरीश पिंपळे यावेळी म्हणाले. या घटनेनंतर भाजप आणि मूर्तिजापूरमधील काही लोकांत वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी देखील लोणारे यांनी असाच प्रकार केला होता, असे आमदार पिंपळे म्हणाले.
फोनवरून झालेल्या या धमकीच्या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी अद्याप त्यांच्या संदर्भात झालेल्या आरोपांचा कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. मूर्तिजापूर पोलिसांनी मात्र यासंदर्भातील आरोप फेटाळले आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होताना प्रत्येकानेच भान राखले पाहिजे.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा तणावाचा प्रसंग निर्माण होतो. त्यामुळे असा प्रकार घडणार नाही. याची दक्षता सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तूर्तास यांदर्भात कारवाई करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.