Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोंदियातील राजकारणात राजकीय हालचालींचा वेग आला आहे. राजकीय घडामोडीत काँग्रेसने पक्ष फोडीची खेळी सुरू केली आहे.कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवारगटाचे नेते डॉ. अजय लांजेवार यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. डॉ. अजय लांजेवार यांच्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाला बळ मिळणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेले “अच्छे दिन” राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही असेच कायम ठेवायचा असा दम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.
सडक अर्जुनी नागरी सत्कार कार्यक्रमात डॉ. अजय लांजेवार यांनी हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केले. यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणखी बळकटी मिळाली असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली.
काही दिवसांपासून सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसच्या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे लक्ष लागले होते. सडक अर्जुनी काँग्रेस कमेटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा नागरी सत्कार व पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सहषराम कोरोटे, नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड, तालुका अध्यक्ष मधुसुदन दोनोडे, भागवत नाकाडे, पी. जी. कटरे, अमर वन्हाडे, डॉ. झामसिंग बघेले, अशोक (गप्पु) गुप्ता, सौ. वंदना काळे, उषा शहारे, उषा मेंढे, जगदीश येरोला यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सोडचिट्टी देवून डॉ. अजय लांजेवार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी आ. नाना पटोले यांनी डॉ. अजय लांजेवार यांच्यासह पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. काँग्रेसच्या या मेगा भरतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राकाँ, भाजप व बसपाला धक्का
डॉ. अजय लांजेवार यांचासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बसपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व बसपाला चांगलाच धक्का बसला आहे.