नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. आयोगाने लगेच दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास यादरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.
चाकणकर यांनी गुरुवारी (दि.२५) पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई-वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असेही पोलिसांना सांगितले आहे. या भेटीच्या वेळी सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली.
आम्ही पाठपुरावा करू
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरे जात होती. त्यांच्यावर देखील योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
घराबाहेर पडावे लागले तर..
दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले; तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटर यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. अश्या महिलांना मदत मिळू शकते, असा विश्वास देण्याची गरज आहे. माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार करावा, असेही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.