महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प तर…’

Union Budget : एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया 

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शेतकरी, महिला, कौशल्य विकासाच्या संदर्भात सरकारने केलेल्या तरतुदींचे त्यांनी स्वागत केले आहे. सोबतच युवकांसाठी कल्याणकारी असा हा अर्थसंकल्प असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा आहे. त्यामुळे माझ्यादृष्टीने हा नवरत्न अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.

नविन कररचना ही सामान्यांना, नोकरदारांना दिलासा देणारी असून त्याचे मी स्वागतच करतो. या नव्या कररचनेमुळे करदात्यांची संख्याही वाढेल. यातून विकासाला आवश्यक असणारे करसंकलनातही महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचेही ते म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना बळ

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘गरीब, महिला, युवा, शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद आशादायी आहे. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राला बळ देणारा आहे.’ त्याचबरोबर एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने देखील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाचा कायापालट

या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय यातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर सरकारचा भर आहे. उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा या घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

50 लाख अतिरिक्त रोजगार

आपला देश तरुण आहे असे नेहमी म्हटले जाते. त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पहायला मिळाले. युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात देण्याचा निर्णय हा तरुणांना दिलासा देणारा आहे. 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा देखील निर्धार अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील युवकांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण

देशातील 500 आघाडीच्या कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. पाच वर्षांत जवळपास एक कोटी तरुणांना याचा फायदा होणार आहे. कौशल्य विकासासाठी जाहिर केलेल्या नवीन योजनेद्वारे राज्य सरकार व उद्योगविश्व यांच्या संयुक्त विद्यमातून 5 वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुद्रा योजनेतून दुप्पट कर्ज देण्याचा निर्णयही युवांना सक्षम करणारा आहे, असेही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!