Mumbai : एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाला ना धोरण आहे ना व्हिजन आहे, अशी कडवी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत. कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते, अशी टीका त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी काय केले?
‘देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. परंतु, अर्थसंकल्पाने शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या बहुसंख्य जनतेची घोर निराशा केली आहे. शेतमालाच्या हमी भावाचा मोठा प्रश्न आहे. त्याला कायदेशीर हमी देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात योजना नाहीत. शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी संपवणे दर दूरच तो कमी ही केलेला नाही. कृषी क्षेत्रासाठी काही कोटींचे आकडे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.
ही तर काँग्रेसची नक्कल!
बेरोजगारी संपवण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देणे अपेक्षित असताना त्यावर ठोस धोरण नाही. पाच वर्षांत एक कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी आणि महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या न्याय पत्राची ही नक्कल आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या तोंडाला पाने
अर्थसंकल्पात एनडीए सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त कर देते पण परतावा देताना भाजपा सरकार सुडबुद्दीने वागते याचा प्रत्येय अर्थसंकल्पातून दिसून आला. बिहार व आंध्र प्रदेशाला ४० हजार कोटींचा निधी देताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला नाही. महाराष्ट्राबद्दल भाजपा व गुजरात लॉबीला आकस आहे हे पुन्हा दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचवेळी एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार झाल्याची टीकाही केली.
महसूल मंत्र्यांनी केले स्वागत
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषी सहकारी संस्थाना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या वाटचालीची यशस्वी सुरूवात असल्याची प्रतिक्रीया महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
युवा सक्षम होतील – मंत्री लोढा
हा अर्थसंकल्प देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवा, महिला, शेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षाना ताकद देतील, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.