Nagpur winter session : भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काल (20 डिसेंबर) पुरवणी मागण्यांवर बोलताना शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यावर आज (21 डिसेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासह, जे प्रकल्प रखडले आहेत, जो मुंबईकर मुंबईतून बाहेर गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत घर देण्याचे काम स्वयं-पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाहीच विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे स्वयं- पुनर्विकास योजनेला गती मिळणार, असे मानले जात आहे.
विधानपरिषदेच्या सभागृहात बोलताना शिंदे म्हणाले की, पोलिसांच्या घरांविषयी महायुती सरकार संवेदनशील आहे. पोलिस वसाहती अतिशय दुरावस्थेत आहेत. पोलिस ऊन-पाऊस-वारा कसलाच विचार करत नाही. कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करतात. त्यांना कुटुंबाची चिंता असता कामा नये, अशा प्रकारची भुमिका महायुती सरकारने घेतली आहे. जे पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत ते स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातूनही करू. ज्या झोपडपट्ट्या, धोकादायक इमारती रखडल्या आहेत, बिल्डर पळून गेले. त्यामुळे तेथील लोकं वसई-विरार इकडे गेली. या बेघर झालेल्या लोकांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम महायुती सरकार करणार आहे. यासाठी आम्ही एक योजना केली आहे.
एमएसआरडीसी, एमआयडीसी, एसआरए, म्हाडा, बीएमसी, सिडको या सर्व योजना एकत्र एजन्सी करून जे रखडलेले प्रकल्प आहेत, धोकादायक इमारती आहेत, ज्यांचा पुनर्विकास रखडला आहे, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन लाख घरे घेतोय. एका एजन्सीला दोन-तीन प्रकल्प देणार, त्यात स्वयं-पुनर्विकासही आले. स्वयं-पुनर्विकासाच्या माध्यमातूनही प्रोत्साहन देऊ आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत. जो मुंबईकर बाहेर गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत घर देण्याचे काम महायुती सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नॅशनल पार्क येथील वन जमिनीवर राहणाऱ्या आदिवासीना अजूनही नागरी मूलभूत सुविधा मिळत नाहीत, असा प्रश्न दरेकरांनी उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वन जमिनीवरील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून लोकं राहताहेत, त्यांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत, त्या देण्याचेही काम करू.
Nana Patole : मुख्यमंत्री खूर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात !
जाहीर
पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाला पाचशे एक हजार कोटीचे पॅकेज शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही दरेकरांनी केली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकणाने आपल्याला भरभरून दिलेय. आम्हीही कोकणाला भरभरून देणार. त्यासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलेय. कोकण विकास प्राधिकरणात सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी यांना पैसे टाकायला सांगितले आहे. त्यामाध्यमातून कोकणात जो काही विकास करायचाय तो करतोय. 65 टीएमसी वाहून जाणारे पाणी आहे. त्यावर प्रकल्प करतोय. छोट्या छोटया बंधाऱ्याच्या माध्यमातून जल संधरणाच्या स्कीम करतोय. पाणी अडवून तिथल्या लोकांना बारमाही शेती करण्याची संधी मिळाली पाहिजे. हाही प्रकल्प हाती घेतला असून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग आपण करतोय. कोकणचा गेमचेंजर होईल, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.