Education Policy : शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन रामदास आठवले यांना दिले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र, यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले. मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
Tadoba : नागपूरच्या राजकारणातील किंगची ताडोबाच्या राजाशी भेट
काय म्हणाले आठवले
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. जातीभेद विषमता आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी मनुस्मृतिमध्ये आहेत. त्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी; विषमता आणि जातीभेदाच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक क्रांती केली. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध आहे. रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.