महाराष्ट्र

Risod Constituency : अटीतटीची होणार तिहेरी लढत

Assembly Election : डिमोशननंतर भावन गवळी यांची पुन्हा परीक्षा

Triangular Fight : इतिहासात वत्सगुल्म नगरी असा उल्लेख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात अटीतटीची तिहेरी लढत होणार आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार भावना गवळी, काँग्रेसचे अमित झनक आणि अनंतराव देशमुख यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या भावना गवळी या यापूर्वी खासदार होत्या. मात्र विकास कामांच्या बाबतीत त्यांनी कंजूसपणा केला. अनेक महिने त्या मतदारसंघातून गायब राहिल्या. त्यामुळं त्यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड रोष निर्माण झाला. त्यामुळं महायुतीकडून त्यांच्या नावावर लोकसभा निवडणुकीत फुली मारण्यात आली.

उमेदवारी नाकारल्यानं भावना गवळी नाराज झाल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत भावना गवळी यांचं पुनर्वसन करू अशी घोषणा केली. शब्दश: अर्थ घेतला तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्यांच्या बाबतीत पुनर्वसन या शब्दाचा वापर केला होता. एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला. लोकसभेतून भावना गवळी यांना ‘डिमोशन’ देण्यात आलं. त्यांना शिंदे यांनी विधान परिषदेत ‘बॅक डोअर एन्ट्री’ दिली. राज्यपाल काही नेत्यांना विधान परिषदेवर नियुक्त करीत असतात. त्या कोट्यातून भावना गवळी यांच्या नावाची शिफारस शिवसेनेकडून करण्यात आली. त्यामुळे गवळी शिफारसीच्या जोरावर आमदार झाल्या.

विरोधात प्रचार

भावना गवळी यांच्या विरोधात रिसोड मतदारसंघात हाच प्रचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांचा पराभव निश्चित दिसत होता. त्यामुळंच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. लोकांनी नाकारलेल्या याच उमेदवाराला आणि आधीपासून आमदार असलेल्या गवळी यांना शिवसेनेने पुन्हा एकदा याच पदाच्या शर्यतीत उतरविले आहे. त्यामुळं आधीच आमदार असलेल्या भावना गवळी यांना पुन्हा का आमदार करायचं असा प्रश्न मतदारांना पडला आहे. खासदारकीच्या निवडणुकीनंतर आमदारकीच्या लढाईत भावना गवळी पराभूत झाल्यास त्यांच्यावर ‘रिजेक्टेड’चा पक्का शिक्का बसेल.

गवळी यांच्या व्यतिरिक्त रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक आणि अनंतराव देशमुख हे देखील लढतीत आहेत. देशमुख हे माजी मंत्री आहेत. देशमुख वित्त व नियोजन राज्यमंत्री होते. रोजगार हमी योजना, माहिती व जनसंपर्क विभागही त्यांच्याकडे होता. काँग्रेस, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. देशमुख हे खासदारही होते. 2009 आणि 2019 मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पण त्यांना पराभव झाला. एकेकाळी वाशिम जिल्हा काँग्रेसचे ‘गॉडफादर’ म्हणून ओळख असलेले देशमुख सध्या आपल्या राजकीय रोजगार हमीसाठी धडपड करीत आहेत.

Atul Londhe : रश्मी शुक्ला यांच्या विरोधात याचिका

काँग्रेसचा लढा

रिसोडमधून काँग्रेसनं अमित झनक यांना उमेदवारी दिली आहे. अमित हे माजी मंत्री सुभाष झनक यांचे सुपुत्र आहेत. काँग्रेसचा वारसा त्यांना लाभला आहे. अमित झनक यांचे आजोबा रामराव झनक हे देखील मेडशी मतदारसंघाचे आमदार होते. त्यामुळं काँग्रेसचा वारसा अमित यांना मिळाला आहे. सुभाष झनक यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं अकोला येथे निधन झालं. त्यानंतर वयाच्या 28व्या वर्षी अमित यांनी राजकारणात पदार्पण केलं. अमित हे ईलेक्ट्रानिक्स इंजिनीअर, एमबीए आहेत. इंजिनीअरिंगचं काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना नियतीनं राजकारणाकडं वळविलं.

आमदार असलेल्या अमित झनक यांच्यासह 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. मार्च 2017 मध्ये या सर्व आमदारांनी युती सरकारच्या अर्थसंकल्प विधिमंडळाबाहेर जाळला होता. मार्च ते डिसेंबर 2017 या काळात झनक यांच्यासह हे सर्व 19 आमदार निलंबित होते. काँग्रेसशी असलेल्या झनक परिवाराच्या एकनिष्ठतेचे फळ अमित यांना उमेदवारीच्या रुपानं मिळालं आहे. असं असलं तरी रिसोडमध्ये त्यांना भावना गवळी, अनंतराव देशमुख यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. आतापर्यंत ‘जायंट किलर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भावना गवळी आणि अनंतराव देशमुख यांचा झनक यांनी पराभव केल्यास ते ‘डबल जायंट किलर’ ठरू शकतात.

error: Content is protected !!