Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये 2019 पासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा बिघाडीचे संकेत आले, तेव्हा तेव्हा शरद पवारांनी मध्यस्थी केली. सध्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात काही जागांवरून वादाची ठिणगी पडली आहे. अगदी आमचा मार्ग मोकळा आहे, असे बोलण्यापर्यंत हा वाद पोहोचला. मात्र आता शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत पहिल्या यादीत वादग्रस्त जागा होल्डवर ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीच काही जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. भाजपने 99 उमेदवारांची यादीच जाहीर केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 16 उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे या जागा निश्चित झाल्या. मात्र अद्याप महायुतीमध्ये शिंदे गट, महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. यात काँग्रेसने मंगळवारी पहिली यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच प्रमुख नेते व आमदार उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेपुढे झुकायचं नाही, अशी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वापुढे मांडली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघेल, तेव्हाच वादग्रस्त जागांचा निर्णय होईल, हे निश्चित झाले.
काँग्रेस महाराष्ट्रातील 96 उमेदवारांची नावे मंगळवारी घोषित करणार आहे. यात विदर्भातील सात आणि इतर पाच अशा एकूण बारा मतदारसंघांना होल्डवर ठेवण्यात येईल. यामध्ये दक्षिण नागपूर, रामटेक, कामठी, आरमोरी, कामठी, आर्वी या मतदारसंघांचा समावेश आहे. तर विदर्भाबाहेरील शिवडी, माहीमसह आणखी काही मतदारसंघांमध्येही वाद आहेत. त्यामुळे या जागांवरील उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश नसेल, हे स्पष्ट आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाना पटोले (साकोली), विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), डॉ. नितीन राऊत (नागपूर उत्तर), यशोमती ठाकूर (तिवसा), विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) यांच्या नावांचा समावेश राहू शकतो.
Assembly Election : उमेदवार तुमचा, चिन्ह आमचे! अजित पवार जिद्दीला पेटलेत!
फडणविसांच्या विरोधात कोण?
दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार, याची उत्सुकता लागलेली आहे. सध्या तरी काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र आता रश्मी बर्वे यांचे नाव पुढे येत आहे. रामटेक लोकसभा निवडणूक लढण्याचे स्वप्न जात वैधता प्रमाणपत्रामुळे भंगले होते. त्यातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र भाजपनेच हे कारस्थान केल्याचा त्यांचा दावा होता. आता त्याचाच वचपा घेण्याची संधी बर्वे यांना मिळू शकते.