एखाद्या तालुक्याला दोन आमदार मिळाले तर त्या तालुक्यात भरपूर निधी येतो. तेथे विकासाची गंगा वाहत असेल, असे सामान्यतः आपण म्हणू शकतो. मात्र गोंदिया जिल्ह्यात याचा विपरीत स्थिती पाहायला मिळत आहे. गोरेगाव तालुका, तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव अशा दोन विधानसभा क्षेत्रांत विभागला आहे. त्यामुळे तालुक्याला दोन आमदार मिळाले आहेत. असे असतानाही विकासकामांत तालुका पिछाडीवर आहे.
गोरेगावातील सिंचन, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा सर्व महत्वाच्या क्षेत्रांत अनेक वर्षांपासून तालुक्याची धडपड सुरू आहे. तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कालपाथरी व कटंगी या दोन मध्यम प्रकल्पांची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र या दोन्ही प्रकल्पांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. उलट ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले कालवे पांढरा हत्ती ठरत आहे.
कलपाथरी मध्यम प्रकल्पात एक कालवा असून, त्याचा लाभ फक्त मोहाडी, कामरगाव, बबई येथील शेतकऱ्यांना मिळत आहे. उर्वरित देउटोला, म्हसगाव, बोटे, झांज्या दवडीपार येथील शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. कटंगी मध्यम प्रकल्पांतर्गतही अशीच परिस्थिती आहे. कटंगी, पुरगाव, सिलेगाव येथील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळत असताना चंद्रपूरटोली, हिरडामाली, हलबीटोला, गोरेगाव या शहरातील शेतकऱ्यांना मात्र लाभापासून वंचित ठेवले जात आहे.
अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. लोकप्रतिनिधींसह कुणीच याकडे लक्ष देत नाही. हिरडामाली येथे महाराष्ट्र शासकीय औद्योगिक विकास मंडळाची जागा आहे. मात्र रोजगार नसल्याने बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात परराज्यात जावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रातही अनेक समस्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची मोठी समस्या आहे.
ग्रामीण रुग्णालयाशिवाय 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 आयुर्वेदिक रुग्णालये उपलब्ध असली तरी सर्वच रुग्णालये समस्यांनी घेरले आहेत. परिसरात डॉक्टरांचा तुटवडा आणि औषधांचा साठा नसणे, अशी समस्या सातत्याने भेडसावत आहे. या सर्व समस्या लक्षात घेता आमदार करतात काय, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.