Pune Accident : पुण्यातील अल्पवयीन रिअल इस्टेट व्यवसायीकाच्या अल्पवयीन मुलाने मध्यरात्री महागड्या पोर्शे कारने दोघांना चिरडून टाकले. एका पबमधूनच बड्या बापाचं ते पोरगं ‘नशे मे धूत…’ अवस्थेत निघालं होतं. त्यामुळे अवैध पब, बार, रुफ टॉप हॉटेल्सवर कारवाई व्हावी, यासाठी पुणेकर रस्तावर उतरले आहेत. हीच कारवाई नागपुरातही व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी बाह्या खोचल्या आहेत.
पबमधून निघतांना नशेत कार चालवून वेदांत अग्रवाल याने दोन जणांना उडविले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत पब संचालकावर कारवाई झाली आहे. शंभुराज देसाई यांनी त्या पबचा परवाना रद्द केला आहे. राज्यात मध्यरात्री, पहाटेपर्यंत सुरू राहणारे अवैध पब, बार, रुफ टॉफ हॉटेल्स वर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागपुर शहरातील रामनगर, वर्धा रोड, रामदासपेठ, धंतोली, लक्ष्मीनगर, सदर, हिंगणा रोड, सीए रोड, सिव्हील लाईन व इतर रहिवासी क्षेत्र मिळून 100 च्या वर रुफ टॉप हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार रात्री टेरेसवर मध्यरात्रीपर्यंत म्युझिक, डीजे वाजवता येत नसतानाही रहिवासी भागात म्युझिकसोबत मद्यपार्टी सुरु असते.
निर्देशांचे उल्लघंन सर्रास
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लघंन सर्रास होते आहे. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 सुधारित कायद्याचेही सर्रास उल्लघंन सुरू आहे. इमारतीचा नकाशा मंजूर करतांना टेरेस खुलेच असले पाहिजे. त्या ठिकाणी कुठलेही व्यावसायिक बांधकाम करणे आणि व्यवसाय करण्यावर बंदी आहे. असे असतानासुद्धा खुले आम टेरेसवर पब, बार, रेस्टॉरेंट, हुक्का पार्लर शहर भर सुरू आहेत.
यांपैकी अनेकांकडे नगर रचना विभागाची परवानगी नाही. फायर एनओसी नाही, पोलिस परवानगी नाही, जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही, रहिवाशांची परवानगी नाही, वाहतूक विभागाची एनओसीसुध्दा नसल्याने महापालिकेचे अधिकारी, नागपुर सुधार प्रन्यासचे अधिकारी, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे.
शुल्क विभागाकडून परवानगी नाही
टेरेस बारला आजपर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली नाही. टेरेस वर कोणी बार चालवित असेल तर त्याचा परवाना रद्द होऊ शकतो. तरीसुध्दा बिनधास्त टेरेसवर मद्यपार्टी, धिंगाणा सुरु असतो. यंत्रणेकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते का? पबच्या नावावर हुक्का पार्लरचे प्रमाण वाढले आहे. अनेक इमारतीत पार्किंग नसताना हॉटेल्स चालविण्याकरीता परवानगी दिलीच कशी, यावर कारवाई का होत नाही? रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल्स सुरू करता येत नाहीत.