Political War . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्ता धूत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओ मुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटलेले दिसून येत आहे. नाना पटोलेंच्या या व्हिडिओवर भाजपाकडून तिखट प्रतिक्रीया येणे सुरू झाले आहे. अशात भाजपाचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर टिकेची तोफ डागली असतानाच नानांना अजब सल्लाही दिला. नाना पटोले यांनी चिखलात पाय माखल्या नंतर आपल्या कार्यकर्त्या कडून पाण्याने ते धुवून घेतले हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्यासारखे आहे. अशा सरंजामशाही वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे गांधी घराण्याचे काम नाना पटोलेंच्या रक्तात भिनलंय. त्याला पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही. या कृत्याबाबत प्रायश्चित्त म्हणून पटोलेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.
काँग्रेसमध्ये पहिल्यापासून हुजरेगिरीला महत्व होते. परंतू थोडेसे यश मिळाल्याने हुरळून गेलेल्या नाना पटोलेंचा माज, मग्रुरी आणि उन्माद या कृत्यातून दिसून येतोय. पाय धुवून घेण्याची त्यांना हौस आहे तर त्यांनी बुवाबाजी करावी, असेही दरेकर म्हणाले. झालेला प्रकार दुर्दैवी असून नानांसारख्या प्रवृत्तीला त्यांचेच कार्यकर्ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. मस्ती कार्यकर्ता उतरवत असतो. ज्यावेळी कार्यकर्त्याला दुर्लक्षित, अपमानित केले जाते, अशा प्रकारे हुजरेगिरीने लाचारीने वागवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता, ताकद कार्यकर्त्यात असते. नाना पटोलेंना त्यांच्या मग्रुरीचा जाब कार्यकर्ताच विचारेल. त्याचे परिणात येणाऱ्या काळात पक्षात आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकांत दिसून येतील, असेही दरेकर म्हणाले.
फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर दरेकर यांनी विधान केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय की, महाराष्ट्र भाजपाची त्यांनी राजीनामा देऊ नये अशी इच्छा आहे. कोअर कमिटी, महाराष्ट्र-मुंबई कार्यकारिणी या सर्वांचे नेतृत्व सरकारमध्ये राहूनच देवेंद्र फडणवीस यांनी करावे. त्याचबरोबर पक्ष संघटनाही सरकारमध्ये राहून चालवता येईल, असा पक्षाचा मानस आहे. देवेंद्र फडणवीस मुरब्बी, अभ्यासू आणि संवेदनशील नेते आहेत. महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार करून ते योग्य तो निर्णय घेतील. तशा प्रकारची प्रगल्भता आमच्या नेतृत्वात आहे, असेही ते म्हणाले.
जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो
आमदार प्रवीण दरेकर यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवावर आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली. सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या मागणीवर बोलताना दरेकर म्हणाले, पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. जय पराजय नेतृत्व ठरवत नसतो. जरी अल्पशा मताने पराभव झाला असला तरी त्या बीडच्याच नव्हे महाराष्ट्राच्याही लोकप्रिय अशा नेत्या आहेत. त्यांच्याविषयी धस यांनी अशी मागणी केली असेल तर ती रास्त आहे.
माणुसकी हरणार नाही
वसईतील घटनेवर बोलताना दरेकर म्हणाले की, अशा प्रकारे घटना झाल्यावर माणुसकीने, संवेदनशील भावनेने नागरिकांनी भुमिका निभावण्याची गरज आहे. कायदे मदतीला, वाचवायला जरी गेला तर त्याला ते भोवतात म्हणून काही लोकं दुर्घटना घडते तेव्हा समोर असूनही सहभाग घेत नाहीत. याचा एकत्रित विचार करून माणुसकी हरणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
आंदोलनातून समाजात भिंती उभ्या होणार नाहीत
ओबीसी-मराठा आंदोलनावर बोलताना दरेकर म्हणाले की, समाजा समाजात अशा प्रकारच्या आंदोलनातून ज्या भिंती उभ्या राहताहेत त्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. याआधीही आंदोलने झाली परंतू आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या नावावर सरकारला वेठीस धरून समाजा समाजात जातीय तेढ कधीही महाराष्ट्राने पाहिलेली नाही. ज्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारशी निट चर्चा करून कुठलाही समाज दुखावला जाणार नाही, कुठल्याही समाजाच्या आरक्षणावर, अधिकारावर गदा येणार नाही, अशा प्रकारची सरकारची विषय हाताळण्याची मानसिकता आहे. परंतू समाजासमाजाने अशा प्रकारची आंदोलने करून समाजा समाजात भिंती उभ्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Maharashtra : लोकसभेत एकही जागा न लढविणाऱ्या रिपाइंची ‘डिमांड’
महायुतीतील नाराजी जाहिरपणे बोलू नका
महायुतीच्या सर्व प्रवक्ते, नेत्यांनी महायुतीत विसंवाद होईल अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य करू नये. सगळ्या पक्षाची लोकं आपापल्या परीने बोलतात, व्यक्तिगत ती भूमिका असते. महायुतीवर परिणाम होईल अशा प्रकारची वक्तव्ये जाहीरपणे बोलू नये. मोठा-छोटा, जास्त जागा हे जाहीरपणे बोलून आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. अंतर्गत चार भिंतीत महायुतीच्या बैठका होतील त्यात जे काही विश्लेषण वाटते ती भूमिका मांडली तर आपल्या भविष्यातील एकसंघतेला धोका पोचणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे, अशी सल्लावजा सूचना दरेकर यांनी केली.