Winner Session : विधानसभेतील विरोधीपक्षनेत्याला सभागृहात सरकारच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व करायचे असते. या पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. विरोधी बाकावर बसायचे असले तरीही एका कॅबिनेट मंत्र्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा या नेत्याला मिळत असतात. मात्र, यंदा विधानसभेच्या विरोधीपक्षनेत्याबाबत सस्पेंस कायम आहे. विधानसभेत विरोधीपक्षांचे नेतृत्व कोण करणार हे ठरलेले नाही. पण नागपुरात या विरोधीपक्षनेत्याचा बंगला मात्र सजलेला आहे. त्यामुळे सरकारच्या मनात नेमकं काय चाललय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान विरोधीपक्षनेत्याचा बंगला सजलेला असला तरीही यात कोण राहणार, हे अद्याप ठरलेले नाही.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळालं. सरकारही स्थापन झालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरले. दोन दिवसांत मंत्रीमंडळ निश्चित होईल. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे हाल झाले. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसला एकत्रितपणे 50 ची संख्याही गाठता आली नाही. नियमानुसार संख्याबळ नसल्यामुळे विधानसभेत विरोधीपक्षनेता असणे शक्य नाही. पण, यात विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी नियमांमध्ये सुधारणा केली तर शक्य आहे. नागपुरात विरोधीपक्षनेत्याच्या बंगल्याची रंगरंगोटी सुरू आहे. बंगला जवळपास सज्ज झालेला आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेत्याच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली मागणी सत्ताधाऱ्यांनी मानली असावी, असा कयास लावला जात आहे.
नेत्यांची भेट
दोन दिवसांपूर्वी विशेष अधिवेशनाच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विधानसभेतील उपाध्यक्षपद आणि विरोधीपक्षनेतेपद याविषयी त्यांनी चर्चा केली. पूर्वी विधानसभा अध्यक्ष सत्ताधाऱ्यांचा आणि उपाध्यक्ष विरोधकांचा असायचा. मात्र, भाजप-शिवसेनेने त्या परंपरेला फाटा दिला. पण यंदा उपाध्यक्षपद आम्हाला मिळावे, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. यासोबतच संख्याबळ नसले तरीही सत्ताधारी आणि अध्यक्षांनी विरोधीपक्षनेतेपदाच्या संदर्भातही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.
विरोधकांनी मागणी केली असली तरीही सरकारच्या मनात काय चाललय, हे अद्याप कळलेलं नाही. विशेष म्हणजे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी तर केली, पण अद्याप काँग्रेसने गटनेत्याच्या बाबतीतच निर्णय घेतलेला नाही. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भास्कर जाधव यांना गटनेता म्हणून घोषित केले. तर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांना गटनेता केले. पण, काँग्रेसने अद्याप सस्पेंस कायम ठेवला आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालणार, याबाबत अद्याप चर्चाच सुरू आहेत.
Maharashtra : राहुल नार्वेकर यांचेवर स्तुतीसुमनांचा वर्षाव !
तर विरोधीपक्षनेता कुणाचा?
नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधीपक्षनेता असणार की नाही, याबाबत काहीच ठरलेले नाही. मात्र, विरोधीपक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाल्यास महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा दावा असेल, याचीही चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे विरोधीपक्षनेते आहेत. पण विधानसभेतही तेच दावा करू शकतात, असे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 16 व राष्ट्रवादीने 10 जागा जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनाच प्रबळ दावेदार असू शकते.