Political war : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार व आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणणार, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. त्या दृष्टीने वागणूक दिली. परंतु कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता, ते आता स्पष्टपणे बाहेर येत असल्याचेही दरेकर म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातील कार अपघातावर बोलताना दरेकर म्हणाले कि, अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही.
अपघाताचे राजकारण करू नये..
याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोण समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः वकील असल्याने पोलिसांइतकेच त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे.
राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. ते नवखे नाहीत. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. त्यांना कलमं माहित आहेत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता त्या पबवरही कारवाई झालेली आहे. त्यामुळे विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.
एका विजयानेच ‘ते’ वातावरण बिघडवायला लागले..
रविंद्र धंगेकर आणि निलेश लंके यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, रविंद्र धंगेकर एकदा आमदारकीत विजय मिळाल्यामुळे समजात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. कारण सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत. कारवाई करताहेत. धंगेकरांना केवळ या विषयाचे राजकारण करायचे आहे. धंगेकर पराभूत होणार असल्याचे माहित असल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे.
देशमुखांना नैतिक अधिकार आहे का?
निलेश लंकेही त्याच धाटणीतील आहेत. त्यांचाही पराभव होणार आहे. बाळूमामा म्हात्रेही भिवंडीतून हरणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले, ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? अनिल देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोला दरेकरांनी लगावला.
Pune Hit and Run : नागपुरातही आहेत,अवैध टेरेस बार, पब्स, हॉटेल्स, हुक्का पार्लर !
दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबईत सहाच्या सहा जागा भाजपा आणि शिवसेना जिंकेल. राज्यात ४५ पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू. परंतु ४० च्या वर भाजपा व महायुती शंभर टक्के जागा जिंकू ४० च्या खाली एकही जागा नसेल, असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
येणाऱ्या अधिवेशनात पर्दाफाश करणार..
निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे कामं आहे. त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे. या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मी सत्ताधारी पक्षाचा असून भुमिका घेतलेली. मी प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो.
कोंबड्याचा खुराडा असतो, तशा प्रकारची व्यवस्था होती. घुसमटून लोकं मेली नाहीत, हे आपले नशीब आहे. मतदान केंद्रे वातानुकुलीत असावी, वेटिंगच्या जागाही वातानुकुलीत असाव्यात, एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत. जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज आहे. येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश मी करणार आहे, असे दरेकर म्हणाले.