Education : राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 जून पासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र जून महिना अर्धा उलटूनही या घोषणेवर कुठलीही कार्यवाही झाली नाही. याच मुद्दा पकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाना साधला. वडेट्टीवारांनी एक्स हँडलवर ट्वीट करीत ‘घोषणा फुल्ल, प्रत्यक्षात मात्र बत्ती गुल…असं हे तीन चाकी सरकार आणि त्यांचं कामकाज’, असा टोला लगावला आहे.
एक राज्य एक गणवेश या योजनेला सर्व स्तरातून विरोध झाला. तरी सरकारने जीआर काढून अंमलबजावणीचे आदेश दिले. आता शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना गणवेश आले नाही. या घोषणेचा पण फज्जा उडाला. नुसत्या घोषणा करणे – प्रसिध्दी मिळवणे, कारभार मात्र शून्य… असा महायुती सरकारचा कामकाज!, असेही वडेट्टीवार त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शिक्षणमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत
राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या वेळी जळगावमधील कार्याक्रमात ही घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे वार्षीक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी यासह विविध 662 अभ्यासक्रमांसाठी कुठलेही शुल्क लागणार नाही. मुलींना मोफत शिक्षण मिळेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात अर्धा जून उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला केलेल्या घोषणेचे पानही हललं नाही. प्रत्यक्षात मुलींना प्रवेशासाठी भरमसाठ शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे ही घोषणा हवेतच विरल्याचे चित्र निर्माण झाले. यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.
फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
जळगाव येथील कार्यक्रमात मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परभणीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री दोन वाजता फोन केले आणि अशा घटना घडू नयेत यासाठी मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना सुरू करण्यास सांगितले. अशी माहिती चंद्रकात पाटील यांनी जळगावमधील कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर त्यांनी या योजनेची घोषणा करून 1 जूनपासून राज्यात योजना लागू होणार असल्याचे सांगितले. यासाठी लागणाऱ्या बजेटचीही माहिती पाटील यांनी दिली होती.
Sanjay Raut : वायकरांच्या मेहूण्याने वापरलेला मोबाईल पोलीस ठाण्यातून गायब
आता राज्यात सर्वत्र प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशात विद्यार्थिनी प्रवेश घेताना फी माफ असल्याचे सांगतात तर दुसरीकडे महाविद्यालयांना असे कुठलेही परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगितले जाते. अशात आता विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याच्या घटना घडत आहेत.