महाराष्ट्र

Lok Sabha Election : 7 मे रोजी होणार 11 मतदारसंघात मतदान

Third Phase : निवडणुकीचा तिसरा टप्पा

Lok Sabha voting  : राज्यात मंगळवार, 7 मे रोजी 11 लोकसभा मतदारसंघांत होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामती, कोल्हापूर, लातूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, हातकणंगले, माढा, धाराशिव (उस्मानाबाद), सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या अकराही मतदारसंघात रविवारी सायंकाळी प्रचार थांबला. बारामतीत सभांचा जल्लोषच दिसून आला. एका बाजूस अजित पवार गटाच्या नेतृत्वातील तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या नेतृत्वातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा होती. निशाणा साधण्यात आला. जणू “पवार फॅमिली कॉनट्रोवरशिअल शो”च भरला होता. माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा जोर होता. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला. ही लढाई आपसी नसून देशाच्या प्रगतीसाठी आहे. त्यामुळे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदारांनी महायुतीला पसंदी द्यावी, अशी मागणी देखील जनतेला केली.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान आणि उमेदवार

बारामती : बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.येथे महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढणार आहेत. नणंद आणि भावजयीची थेट लढत आहे.

रायगड : रायगड या मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अनंत गिते आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात लढत होणार आहे. तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Lok Sabha Election : बारामतीसाठी विदर्भाच्या नेत्यांची फौज

हातकणंगले : महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) सत्यजित पाटील मैदानात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढत असल्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे.

माढा : माढा मध्ये भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. परंतू भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेऊन भाजपला धक्का दिला. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

धाराशिव : महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील महायुतीकडून निवडणूक लढणार आहेत. अर्चना पाटील तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.

सोलापूर : महायुतीतील भाजपचे आमदार राम सातपुते तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. मागील दोन निवडणुकांपासून येथे भाजपचे खासदार होते. परंतू ते निष्क्रिय होते, हे भाजपसाठी अडचणीचे ठरू नये म्हणून सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली.

सांगली : या मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेनेला जागा सुटल्यामुळे काँग्रसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. भाजपने महायुतीकडून खासदार संजयकाका पाटील यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवले आहे. येथे काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, अशी चर्चा आहे.

लातूर : येथे भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या विरोधात डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काळगे यांच्या विजयासाठी अमित देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख कामाला लागले आहेत.

कोल्हापूर : महायुतीतर्फे खासदार संजय मंडलिक आहेत. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली व महायुतीची कोंडी केली. परंतू महायुतीने मंडलिक यांना उमेदवारी देऊन ती कोंडी फोडली. कोल्हापूर मतदारसंघात महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली.

साताराः छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस उदयनराजे भोसले यांना सातारा मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी दिली आहे. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी महाविकास आघाडीला नकार दिला. यामुळे शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील विनायक राऊत यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

 

 

 

 

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!