Crop Insurance : राज्यभरात सध्या शेतकऱ्यांचा पिकविमा काढण्याचे काम सुरू आहे. विम्याची नोंदणी करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. लवकरच ही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठीची मुदत 30 जुलैपर्यंत वाढवावी, असा आग्रह राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांनी याबाबत मागणी केली आहे.
मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिक विम्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी आदेश दिले होते. तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पीक विमा काढण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ही मुदत आता 30 जुलैपर्यंत वाढविण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना राबवित आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ही विमा योजना सरकार राबवित आहे.
उदंड प्रतिसाद
शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण पीक विमा नोंदणीची मुदत 15 जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने त्यात मुदतवाढ गरजेची आहे, असे मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यापूर्वीही सुधीर मुनगंटीवार पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. धान पिकाच्या नोंदणीसाठी सरकारने मुदत निश्चित केली होती. नोंदणी केंद्रांची संख्या कमी होती. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची समस्या ही मोठ्या प्रमाणावर होती. ही बाब मुनगंटीवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली.
भातपिकाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी त्यावेळी केली होती. मुनगंटीवार यांनी नमूद केलेली वस्तुस्थिती पाहता धान पिकाच्या नोंदणीसाठी असलेल्या तारखे मध्ये सरकारने मुदतवाढ दिली होती.
मुदतवाढीचा फायदा धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला होता. असाच पुढाकार आता मुनगंटीवार यांनी शेतकरी पीकविमा योजनेबाबत घेतला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा हेतू त्यामागे आहे. त्यामुळे त्यांनी कृषी मंत्र्यांना तातडीने पत्र पाठवले आहे.
कृषी विभागाने पीक विम्याच्या योजनेसाठी मुदतवाढ दिल्यास राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. अद्यापही राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पीक विम्याची नोंदणी करत आहे. परंतु 15 जुलैपर्यंत सर्वच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच पिक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली आहे.