महाराष्ट्र

Mahayuti : आई‘शप्पथ’! मुंबईला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल!

Nagpur To Mumbai : शपथविधीसाठी कार्यकर्ते, नेते मुंबईच्या दिशेने

New CM : महायुतीच्या सत्तास्थापनेचा सोहळा ‘याची देही याची डोळा’ बघण्यासाठी नागपुरातील हजारो कार्यकर्ते, नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर अनेकांनी 4 डिसेंबरच्या गाड्यांचे रिझर्व्हेशन केले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या आता फुल्ल झाल्या आहेत. यामध्ये तात्काळ आरक्षण मिळण्याची देखील सोय राहिलेली नाही. त्यामुळे नागपुरातील नेत्यांच्या गर्दीनेच शपथविधी सोहळा विशेष गाजण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीतील नेत्यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदी होणार असल्याचा विश्वास नागपुरातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच रिझर्व्हेशन करून ठेवले होते. तर काही नेते व कार्यकर्ते आधीच मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असा विश्वास त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे.

मुंबई येथे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे. नागपुरातील भाजपच्या सर्व आजी-माजी आमदारांसह शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी महापौर संदीप जोशी, काटोल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी अविनाश ठाकरे हे देखील मुंबईत दाखल होत आहेत. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून पक्षाचे किमान 300 लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. तर नागपुरातून जवळपास अडिच हजार कार्यकर्ते शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. तर आजी-माजी खासदार-आमदार, पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी यांची संख्या देखील चारशेपेक्षा जास्त असणार आहे.

Mahayuti 2.0 : शाही शपथविधी; पंतप्रधानांसह 22 मुख्यमंत्री येणार 

नागपुरात लाईव्ह टेलिकास्ट

नागपुरातील विविध भागांमध्ये शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट दाखविण्याची तयारी झाली आहे. जवळपास 25 भागांमध्ये थेट प्रक्षेपण होईल. यामध्ये मध्य, पूर्व, दक्षिण, दक्षिण-पश्चिमसह पश्चिम नागपुरातील ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणांवर भले मोठे एलईडी स्क्रीन लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. यासोबतच जल्लोषाची तयारी देखील आधीच करून ठेवण्यात आली आहे. आतषबाजीची देखील व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तेव्हा ही आतषबाजी करण्यात येईल, असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!