Disciplinary Action : विधानसभा निवडणुकीत पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल भाजपने विदर्भातील चार जणांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. यासंदर्भातील निलंबन आदेश भाजपने 7 नोव्हेंबर 2024 रोजी काढले. मात्र त्यासंदर्भातील पत्र तब्ब्ल दहा दिवसांनंतर भाजपकडून व्हायरल करण्यात आलं आहे. भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीनं हे निलंबन आदेश काढण्यात आले आहेत. यातील एका नेत्यानं तर दुसऱ्या पक्षात केव्हाच जाहीर प्रवेश केला आहे. दुसऱ्यानं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर केला होता.
भाजपने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील रत्नदीप दहिवले यांनी पक्षशिस्त न पाळल्यामुळे निलंबित केले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे रमेश बुंदिले यांनाही निलंबित करण्यात आले आहे. बुंदिले हे यापूर्वी महावितरणमध्ये कार्यरत होते. त्यांना भाजपने गेल्या निवडणुकीत संधी दिली होती. मात्र यंदा त्यांनी रवी राणा यांच्या युवा जनशक्ती पार्टीत प्रवेश केला. आता ते दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. रवी राणा हे महायुतीसोबत आहेत. बडनेरा मतदारसंघात महायुतीनं राणांना पाठिंबा दिला आहे.
राणांसाठी घात
बडनेऱ्यात राणा यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्यानं भाजपनं तुषार भारतीय यांना निलंबित केलं आहे. मात्र त्याच राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्या विरोधात उमेदवार दिल्यानंतरही त्यांना भाजप सोबत घेऊन फिरत आहे. याउलट भाजपमधून बुंदिले यांना निलंबित करून भाजपने त्यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. राणा हे अमरावती जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा टाकणारे ठरत आहेत. जिल्ह्यातील एकाही नेत्याचे राणा यांच्याशी पटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला राणांबाबत सल्ला दिली. अजित पवार यांनी राणा यांना विनाशकाले विपरित बुद्धी सुचत असल्याचं नमूद केले. मात्र राणा यांनी अजित पवार यांनाही उद्धटपणे उत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीत सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं. त्यावेळी विनाशकाले विपरित बुद्धी सुचली नाही का? असा प्रश्न राणा यांनी उद्धटपणे अजित पवार यांना विचारला आहे. याच पवारांच्या भरवश्यावर नवनीत राणा आयुष्यात पहिल्यांदा खासदार झाल्या, याचा विसरही राणा यांना यावेळी पडला. रवी राणा आणि नवनीत राणा हे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे इतकं बोलू शकतात असाच संदेश आता महायुतीत गेला आहे. त्यामुळं राणा यांना फडणवीस यांचीच फूस असल्याचा मेसेज सगळीकडं जात आहे.
अकोल्यातील दोघांचा समावेश
अकोला येथील दोन नेत्यांनाही भाजपनं निलंबित केलं आहे. यातील हरीश अलीमचंदानी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपपुढं मोठं आव्हान निर्माण केलं आहे. दुसरे व्यक्ती आहेत डॉ. अशोक ओळंबे आहेत. ओळंबे यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीत प्रवेश केला आहे. अलीमचंदानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच भाजपाध्यक्षांकडे राजीनामा पाठविला होता. अशात 7 तारखेला निघालेले निलंबन आदेश 10 दिवसांनंतर 16 तारखेला का व्हायरल झाले हे अनाकलनीय आहे.