Assembly Election : विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यापूर्वी महायुती सरकार वेगवेगळ्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची शेवटची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वतंत्र महामंडळांची मागणी
गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांच्या स्वतंत्र महामंडळांची मागणी होत होते. विविध पत्रकार संघटना या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये लढा देत होती. अखेर सर्वांच्या लढ्याला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या महामंडळाला मान्यता दिली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांना बोलवून विधान भवनामध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये महामंडळासाठी शासकीय नियमावली तयार करून महामंडळाचे कामकाज सुरू होईल असे ठरले. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पत्रकाराला लाभ घेता येणार आहे.
पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने ही प्रयत्न केले. महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पदरामध्ये महामंडळासारखा खूप मोठा विषय पाडून घेतला. गेल्या आठवड्यात राज्यातल्या तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आंदोलन केले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा आझाद मैदानावर होता. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी आश्वासन देत आझाद मैदानावरील आंदोलनाची सांगता केली.
लेखी आश्वासनासोबत या विषयाच्या अनुषंगाने एक मीटिंग लावावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने केली होती. मंत्री शंभूराजे देसाई, महासंचालक ब्रिजेससिंह, संचालक राहुल तिडके यांनाही या अनुषंगाने निवेदन देऊन आंदोलनाची तीव्रता सांगितली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी मागण्या मंजूर केल्या असे सांगत दुसऱ्या दिवशीच या मागण्यांबाबत बैठक लावण्यासंदर्भातील आदेश दिले होते.
या बैठकीला ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महासचिव दिव्या भोसले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, सरचिटणीस चेतन कात्रे, उपाध्यक्ष यास्मिन शेख, उपाध्यक्ष राजेंद्र थोरात यांना निमंत्रित केले होते. महामंडळाच्या अनुषंगाने तातडीने सरकारी उपाययोजना आखाव्यात, महामंडळ कार्यान्वित करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
Sanjay Gaikwad : ‘माझ्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार’
पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला. महामंडळ व मागण्यांचा विषय शासकीय आणि कायदेशीररित्या पार पाडावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. शेवटी दोन वर्ष पाठपुरावा केल्यावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला यश आले.याबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.