Highway issue : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रस्तावित १०९ किलोमीटरचा भक्तिमार्ग राज्य शासनाने अखेर रद्द केला. मातृतीर्थ सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, चिखली आणि खामगाव तालुक्यांमधून जाणार्या या मार्गाबद्दल शेतकर्यांमध्ये नाराजीची भावना होती. हा मार्ग झाल्यास सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना गमावावी लागणार होती. त्यामुळे या मार्गाला विरोध सुरू झाला होता. हा मार्ग रद्द झाला नसता तर या भागातील विद्यमान आमदारांना याचा फटका बसला असता. मात्र हा मार्ग रद्द करवून घेत सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले आणि खामगाव चे आमदार आकाश फुंडकर यांनी आपला उमेदवारीचा मार्ग मोकळा करून घेतला.
या भागातील शेतकऱ्यांच्या भावनेची दखल घेऊन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी राज्य शासनाकडे हा मार्ग रद्द करावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला. विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करून त्यांनी आपली मागणी लावून धरली होती. अखेर आ. महाले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने भक्ती मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला व या संदर्भातला शासन आदेश शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात आला.
सिंदखेडराजा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान आणि संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणजे शेगाव. अशा दोन पर्यटनस्थळांना जोडणारा तसेच समृद्धी महामार्गाला संलग्न असणारा १०९ किलोमीटर लांबीचा हा संकल्पित भक्तिमार्ग त्याच्या घोषणेपासूनच वादात अडकला होता. या भक्ती महामार्गामध्ये आपली सुपीक जमीन जाणार असल्याने शेतकर्यांकडून या मार्गाला विरोध सुरू झाला होता. अनेक शेतकर्यांनी हा मार्ग रद्द करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. तर अनेक आंदोलने या भागात झाली. याबाबत आमदार श्वेता महाले यांनी राज्य शासनाकडे याबद्दल पाठपुरावा केला. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे जिल्ह्यातील शेतकर्यांची तीव्र भावना पोहोचवली होती.
कृती समितीचा जल्लोष; फटाके फोडले, पेढे वाटले..
शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारने अखेर भक्ती महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली. शासनाच्या या निर्णयाचा जल्लोष चिखलीत करण्यात आला. भक्ती महामार्ग विरोधी कृती समितीच्या लढ्याला यश आल्याची भावना यावेळी विनायक सरनाईक, डॉ. ज्योती, शेतकरी नेते दासा पाटील, सभापती सत्येंद्र भुसारी खेडेकर यांनी व्यक्त केली. चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ महामार्ग विरोधी कृती समितीने फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला.
अनेक आंदोलने झालीत
महामार्ग विरोधी कृती समितीने महामार्ग रद्द व्हावा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली होती. टॉवरवर चढून आंदोलन, रास्तारोको, नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, उपोषण, थाळी बजाव आंदोलन केले. या आंदोलनांची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. भक्ती महामार्ग रद्द व्हावा यासाठी वेळोवेळी आंदोलन करणाऱ्या तसेच शासन दरबारी पत्रव्यवहार करणाऱ्यांचे यावेळी महामार्ग विरोधी कृती समितीने आभार व्यक्त केले.