महाराष्ट्र

Mahayuti : मंत्री झाले, आता पालक होण्यासाठी चुरस!

Maharashtra Government : तिन्ही पक्षांचे मंत्री इच्छुक; उत्सुकता वाढली

या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही.

Political News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटपही झाले आहे. आता पालकमंत्री पदाचे वेध लागले आहेत. आपल्या जिल्ह्यावर आपले प्रभुत्व रहावे यासाठी अनेक मंत्र्यांनी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. या पदासाठी बरीच रस्सीखेच बघावयास मिळत आहे. महायुती सरकार मध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या घटक पक्षांचा समावेश आहे. तिन्ही पक्षांचे मंत्री पालकमंत्री पदावर आपली नियुक्ती व्हावी यासाठी आपल्या परीने फिल्डिंग लावत आहेत. एक दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील. या बाबत विचार विनिमय करून तोडका काढण्यात येईल. तिन्ही घटक पक्षात योग्य समन्वय आहे. कोणतीही अडचण येणार नाही असे सांगण्यात येते.

प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी पालक म्हणून वडीलांकडे असते. वडील ही जबाबदारी योग्य पणे निभावतात. घरातील प्रत्येकाच्या समस्या समजावून घेणे, त्या सोडविणे, नाते संबंध जोपासणे आणि ते एकसुत्रात बांधून ठेवण्याचे काम घरातील आई वडील हेच करीत असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेच जबाबदारीचे असते.‌ जिल्ह्याविषयी आत्मियता असणारे पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळू शकते.

महत्वाची भूमिका

पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांना कर्तव्याचा भाग म्हणून हजर राहणे एवढेच सिमीत कार्य पालकमंत्र्यांचे नसते. जिल्ह्याचे सर्वांगीण विकासाकडे पालकमंत्र्यांना लक्ष पुरवावे लागते. पालकमंत्री जिल्हा प्रशासन आणि राज्यसरकार यामधील दुवा म्हणून महत्वाची भूमिका बजावतात. जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांची ते प्रभावी अंमलबजावणी करीत असतात. खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी केलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. आणि म्हणूनच जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी अनेक मंत्र्यांची इच्छा असते.

अलीकडच्या काही वर्षांत पालकमंत्री पदाचा दबदबा राहिला नाही. काही मंत्री केवळ औपचारिकता म्हणून जिल्ह्यातील महत्त्वांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. केवळ सोपस्कार पाळणे असे या पदाचे स्वरूप झाले आहे.‌ काही मंत्र्यांकडे अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येते. असे मंत्री आपल्या कार्याला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. असाही अनुभव आहे. काही पालकमंत्री जिल्ह्यात पाच सहा महिने फिरकतही नाहीत. असे जिल्हे विकासापासून दूर राहतात.

Nitin Gadkari : विमानतळाच्या नवीन धावपट्टीवरून संतापले गडकरी

मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर आता अनेकांना पालकमंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या पदासाठी बरीच चुरस होतांना दिसते. काही ठिकाणी या पद नियुक्ती वरुन वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.‌ खाते वाटप पूर्ण झाल्यावर काही मंत्री या पदावर दावे सांगत आहेत. आमच्यात पालकमंत्री पदा बाबत योग्य समन्वय आहे असे सांगण्यात येत असले तरी सध्या तरी वेगळेच चित्र बघायला मिळत आहे.

आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा इच्छुक

मुंबई, पुणे, नाशीक, कोल्हापूर, सातारा, रायगड, या जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी अनेकांनी दावेदारी सांगीतली आहे. लवकरच मुंबई महापालिका निवडणुका होणार असल्याने या भागातील पालकमंत्री पदावर काहींचा डोळा आहे. भाजपचे आशिष शेलार यांना मुंबई शहराचे पालकमंत्री पद हवे आहे. मुंबई उपनगरासाठी मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, उदय सामंत इच्छुक आहेत. मुंबई सह उपनगरातील पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही आहे.

ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक आग्रही आहेत. भाजपचे गणेश नाईक यांनी ही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे चंद्रकांत दादा पाटील इच्छुक आहेत. कोल्हापूर येथे भाजपचे चंद्रकांत दादा पाटील, अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश आबीटकर प्रयत्नशील आहेत.

नाशिक जिल्हा पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे या पक्षाचे दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, भाजपचे गिरीश महाजन इच्छुक आहेत. जिल्ह्यातील 15 पैकी 7 आमदार आमच्या पक्षाचे आहेत. तेव्हा पालकमंत्री पद आपल्या पक्षाला मिळावे अशी भूमिका माणिकराव कोकाटे यांनी मांडली.‌

DCM of Maharashtra : ‘डीसीएम’च्या हस्ते ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’चे प्रकाशन

लाडकी बहीण योजना 

सातारा जिल्ह्यातून आठ पैकी चार आमदारांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली आहे. या जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, तसेच भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवसेनेचे शंभूराज देसाई , राष्ट्रवादी चे मकरंद पाटील , जयकुमार गोरे यांची नावे चर्चेत आहेत. बिड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावातच या पदासाठी चुरस असल्याचे बघावयास मिळते.

रायगड जिल्ह्यांत पालकमंत्री पदासाठी भारत गोगावले, आणि आदिती तटकरे यांच्यांत चुरस आहे. या आधी या जिल्ह्याची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे होती. आता भारत गोगावले हक्क सांगत आहेत. गोगावले यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

मी होणार पालकमंत्री : संजय शिरसाट.

छत्रपती संभाजी नगर येथे आपणच पालकमंत्री राहणार आहोत असा दावा शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी केला आहे. आपली पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली असून फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे असे ते आत्मविश्वासाने सांगतात. संभाजी नगर येथील पालकमंत्री पद भाजपच्या अतुल सावे यांना देण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

विदर्भात उत्सुकता!

विदर्भात कोणत्या मंत्र्यांकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाते याची उत्सुकता वाढली आहे. गडचिरोली आणि नागपूर ,अमरावती, अकोला जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. अकोला जिल्ह्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्या कडे सोपवली जाईल अशी शक्यता आहे. या आधी बच्चू कडू आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही जबाबदारी होती या दोन्ही मंत्र्यांबाबत नाराजीचा सूर उमटला होता.

तर विकासाला चालना मिळेल

आकाश फुंडकर यांचेकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यास जिल्ह्याचे विकासाला चालना मिळेल तसेच सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा व्यक्त होत आहे. मंत्री मंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, उर्जा, सामान्य प्रशासन, माहिती जनसंपर्क ही महत्त्वाची खाती आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, ही महत्त्वाची खाती आहेत. अजित पवार यांचेकडे अर्थ नियोजन उत्पादन शुल्क ही खाती आहेत. जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आपल्या पक्षाला मिळावे या साठी तिन्ही नेते प्रयत्न करीत आहेत.‌

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!