Political News : भारत देश काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न भाजपने पाहिले आहे. नागपूर हे भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. त्यांनाही गेल्या १० वर्षांत नागपूर शहर आणि जिल्हा काँग्रेसमुक्त करता आलेला नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपूर जिल्हा काँग्रेसमुक्त करून दाखवला आहे.
ग्रामीणमध्ये काँग्रेसचे दोन आमदार होते. सावनेरचे सुनील केदार आणि उमरेडचे आमदार राजू पारवे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळ्याच्या प्रकरणात सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे सावनेरला आता आमदार नाही आणि राहिलेले उमरेडचे एकमेव काँग्रेसचे खासदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही.
Lok Sabha Election : धनुष्यबाण राजू पारवेंच्या हाती देण्याचे नेमके कारण काय?
उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेत सहभागी झाल्याने नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसमुक्त झाला आहे. भाजपचे स्वप्न शिवसेनेने पूर्ण करून दाखवले. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पदार्पण केल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. मात्र सावनेर विधानसभा मतदारसंघात सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्याला काँग्रेसमुक्त होऊ दिले नव्हते. विशेष म्हणजे यावेळी सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. त्यानंतर राज्यात भाजप-सेना युतीचे राज्य आले.
२०१४मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वात पुढील विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. असे असतानाही नागपूरच्या ११ जागा भाजपला राखता आल्या नाहीत. ग्रामीणमधील सावनेर, उमरेड आणि काटोल-नरखेड काँग्रेस-राष्ट्रवादीने परत आपल्या ताब्यात घेतले. नागपूर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी भाजपचे सुधाकर देशमुख, उत्तरमधून माजी मंत्री नितीन राऊत यांनी भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना पराभूत केले.
भाजपने नागपूरमधील दोन विधानसभा गमावल्या आणि मध्य व दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार थोडक्यात बचावले. सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे बँक घोटाळाप्रकरणात सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे आजघडीला सावनेरमध्ये आमदारच नाही. उमरेडमधून काँग्रेसचे राजू पारवे निवडून आले होते. त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. पारवेंच्या सोडचिठ्ठीने का होईना रामटेक लोकसभा मतदारसंघ तात्पुरता काँग्रेसमुक्त झाला आहे.
नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. गडकरी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे रामटेक काँग्रेसमुक्त ठेवण्याची जबाबदारी आता राजू पारवे यांच्यावर आली आहे.