Votting Countdown : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी (ता. 16) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी जम्मु काश्मिरातील परिस्थितीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरच्या जनतेला निवडणूक व्हाव्या, अशी इच्छा आहे. गेल्या निवडणुकीत खोऱ्याने हिंसाचार नाकारला. जम्मू-काश्मीरमधील लोकांनी दहशतवाद नाकारला. हिंसेवर बहिष्कार टाकत बुलेटला नव्हे तर बॅलेटला पाठिंबा दिल्याचे राजीव कुमार म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये 2014 मधील विधानसभा निवडणुकीत 87 जागांवर मतदान झाले होते. यापैकी पीडीपीने 28 जागा जिंकल्या. भाजपने 28 जागा जिंकल्या. नॅशनल कॉन्फरन्सने 15 जागांवर विजय मिळविला. काँग्रेसने 12 जागांवर यश प्राप्त केले. तर इतर पक्षांनी 7 जागा मिळाल्या होत्या. जम्मू आणि काश्मीर हा आता विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्ण राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर तेथील विधानसभेचे चित्रही बदलले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आता 114 जागा आहेत. त्यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) येतात. त्यामुळे 90 जागांवर निवडणूक होणार आहे. 90 पैकी 43 जागा काश्मीर विभागात आहेत 47 जागा जम्मू विभागात आहेत. यापूर्वी केवळ 87 जागांवर निवडणूक झाली होती. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पोलिस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये डीआयजी, एसएसपी, एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय 89 आयएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही बदलण्यात आले आहेत.
जम्मुतील नेत्यांना आनंद
निवडणुकीबाबत हालचाल सुरू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे नेते शेख बसीर अहमद म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील जनता निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहत होती. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून देण्याची वेळ आता आली आहे. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला म्हणाले की, मला खूप आनंद झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करावेसे वाटते. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आपण स्वतः निवडणूक लढवणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Assembly Election : जम्मुत तीन, हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
जम्मू-काश्मीर हे आता पूर्ण राज्य राहिलेले नाही. लडाख आता जम्मू-काश्मीरमध्ये नाही. केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर 2024 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक येथे होत आहे. राज्याच्या पुनर्रचनेनंतर विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली. नव्या सुधारणेनंतर आता येथे सहा वर्षांच्या ऐवजी पाच वर्षांचेच सरकार असेल.
हरियाणात चित्र बदलले
हरियाणातही आता राजकीय चित्र बदलले आहे. येथे गेल्या दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु यंदा भाजपने मनोहर लाल यांच्या जागी नायबसिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची सूत्रं पुन्हा एकदा भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्याकडे आहेत. हरियाणात 25 टक्के मतांसह जाट मतदार सर्वांत प्रभावी आहे. पंजाबनंतर हरियाणामध्ये दलित मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. काँग्रेसचा भर जाट आणि दलित मतदारांवर आहे. भाजपचा सर्वाधिक भर ओबीसी मतदारांवर आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’मध्ये युती होण्याची चिन्हे नाहीत. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरियाणाचे आहेत. परंतु त्यानंतरही ‘आप’ येथे पाहिजे तशी आक्रमक दिसत नाही.