या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित’ सहमत असेलच असं नाही.
Political Battel : कुणी एखादी चांगली गोष्ट किंवा कार्य केले की आपल्याला आनंद होतो. समाधान वाटतं. वयाने लहान असलेल्यांच्या अशा कृती बदल त्याचे कौतुक केले जाते. मोठ्या व्यक्ती बदल कृतज्ञता वाटते. त्यांचे आपण मनापासून आभार मानतो. त्यांच्या कार्याची भरभरून स्तुती करतो. आपले वागणे सुसंस्कृत माणसाला शोभणारे असते. त्यात माणूसकीचा ओलावा असतो. आत्मियता आणि प्रेमही असते.
आई-वडिलांना आपल्या मुलांचे भारीच कौतुक असते. मुलं कर्तबगार निघाली, तर त्यांना आभाळही ठेंगणे वाटते. आपला मुलगा किंवा मुलगी किती चांगले आहेत याचा उल्लेख ते शक्यतो संधी मिळेल तेव्हा करतात. असे अनेक कौतुक सोहळे कुटुंबाकडून सातत्याने होत असतात. आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक या सोहळ्याला आवर्जून येतात. मुलांचे त्यांच्या यश कीर्तीचे कौतुक करतात. भावी आयुष्याच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वादही देतात.
मोठे सोहळे
एखाद्याच्या उल्लेखनीय यशाचे कार्यक्रम व्यापक स्वरूपात होतात. कार्य कतृत्वानुसार ते होतात. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक जाणीव जोपासून केलेले कार्य याचा त्यात समावेश होतो. अशा कार्यक्रमांतून मुलांना प्रेरणा मिळत असते. त्यांच्या मधील उत्साह वाढीस लागतो. चांगल्या कार्याची समाज नक्कीच दखल घेतो. आत्विमश्वासही वाढण्यास त्यामुळे मदतच होते.
संस्कारात वाढलेली माणसे काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून आयुष्यात मार्गक्रमण करताना दिसतात. त्याची हिच पाऊलवाट अनेक जण स्वीकारतात. समाजात कसे वागावे, कसे बोलावे याची समज त्यांना असते. अशांच्या वागण्यातून सहसा वाद किंवा संघर्ष निर्माण होत नाही.
नवा पायंडा
राजकारणात मात्र या सर्व गोष्टींना तिलांजली दिली जात आहे. चांगले वागणाऱ्यांऐवजी वाईट वागणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तींची चलती आहे. उद्धट वागणूक असलेल्या कटू बोलणाऱ्या , समाजात दुही पसरविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होऊ लागला आहे. अशाच एका टपोरी तरुणाचा कौतुक सोहळा ‘मातोश्री’वर पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल काढलेले गद्दार हे शब्द त्याचा सत्कार सोहळ्यास कारण ठरते.
Devendra Fadnavis : देशमुख, वाझे यांनी मोठं षडयंत्र रचलं होतं
आजपर्यंत निष्ठावंत शिवसैनिकांना मिळाला नसेल इतका मान त्याला देण्यात आला. हारतुरे देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचे पाठीवर कौतुकाची थाप पडली. या तरूणाला शिवसेनेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. बहुदा त्याच्यावर आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या, सन्माननीय पदे भूषविणाऱ्यांचा अनादर करण्याची जबाबदारी सोपवली असावी.
स्वाभीमान जपला
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे रक्षण करण्यासोबतच मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी शिवसेना या पक्षाची मोठ्या कष्टाने स्थापना केली. तळमळीने कार्य करणारे शिवसैनिक तयार केले. त्यांना पुत्रवत जपले. अन्यायाचा सतत विरोध केला. शिवसेनेचे वलय मराठी माणसाला अभय आणि धैर्य देणारे ठरले. आज त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा मुलगा वडिलांच्या सर्व आशा आकांक्षा तसेच स्वप्नांवर पाणी फेरीत आहे.
शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली.आज ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. शिवसेना फोडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे विषयी पराकोटीचा राग आहे. शिंदे यांचा उल्लेख ते सतत मिंधे आणि गद्दार असाच करतात. उद्धव ठाकरे गटाच्या शब्दकोषात हे दोन्ही शब्द ठळक अक्षरात अधोरेखित केले आहेत. आता तर या शब्दांचा उच्चार सन्मान सोहळ्यास पात्र ठरु लागला आहे.
मुख्यमंत्री भडकले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक प्रचार सभा आटोपून परतत असताना त्यांचे ताफ्यातील वाहन अडविण्याचा प्रयत्न झाला. कांदिवली परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. काहिंनी गद्दार..गद्दार अशी घोषणाबाजी केली. या प्रकाराने एकनाथ शिंदे यांचे माथे भडकले. ते गाडीतून खाली उतरले. जाब विचारण्यासाठी तेथील काँग्रेस कार्यालयात गेले. ‘ऐसे सिखाते है क्या आप लोग‘ असा जाब त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांना विचारला.
गद्दार असे ओरडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांसह पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. गद्दार म्हणून घोषणा देणारा हा तरुण मात्र उद्धव ठाकरे यांचेसाठी हिरो ठरला. हारतुरे देऊन सत्कार, फोटो सेशन असे भारावलेले उत्कट सोहळे या तरुणाला घरी बोलावून पार पडले. मूळ कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याची एकही संधी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत सोडत नाहीत. त्यांची निर्भर्त्सना करण्यासाठी हे दोघेही आपल्या पोतडीतील खास मखमली शब्दांचा वापर करतात.
अलंकृत शब्द
गद्दार, खोकेबाज, मिंधे हे त्यांच्या बोलण्यातले विशेष अलंकृत शब्द आहेत. आता हेच शब्द त्यांच्या महाविकास आघाडीमधील काही धुरंधर वापरत आहेत. आपण मुख्यमंत्री या मानाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींबद्दल चुकीचे बोलत आहोत, याची खंत कुणाला वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे. मारणाऱ्याचे आपण हात पकडू शकतो, बोलणाऱ्याचे तोंड बंद करु शकत नाही. याचा एकनाथ शिंदे यांना विसर पडला असावा. मुख्यमंत्री पदावर विराजमान व्यक्ती, अशा टपोरी व्यक्तीच्या बोलण्याने कसा काय विचलित होऊ शकतो, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
भान नसलेली निर्बुद्ध माणसे काहीही बकत असतात. एखाद्याला डिवचणे व त्यातून आसुरी आनंद मिळवणे, यातच काहींना धन्यता वाटते. हे स्वस्थ आणि निरोगी असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण नाही. असं वागणं आणि बोलणं कोणाला शोभते हे सांगण्याची आवश्यकता नाही. हातून बरंच काही निसटल्यानंतर काही व्यक्ती बेभान होऊन वागतात. त्यांचे असे वागणे समाजात चेष्टेचा विषय होते. उद्धव ठाकरे त्याला अपवाद नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा मुर्खांच्या नादी लागू नये.