Akola Constituency : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 27 हजारांवर मतदार वाढले आहेत. यामध्ये स्त्रियांसह युवा मतदारांची संख्या देखील मोठी आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 8 लाख 26 हजार 651 पुरूष मतदार तर 7 लाख 88 हजार 767 स्त्री मतदार आहेत. तर 49 इतर असे एकूण 16 लाख 15 हजार 467 मतदार आहेत. यामध्ये 30 ते 39 या वयोगटातील मतदारांची संख्या ही 3 लाख 63 हजारांवर आहे.
स्त्रिया समोर
निवडणूक आयोगाकडून 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे एकूण 27 हजार 153 मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात स्त्री मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राबविण्यात आलेल्या या मतदार नोंदणी कार्यक्रमात 9 हजार 662 पुरूष मतदार तर 17 हजार 489 महिला व 2 तृतीयपंथी अशा 27 हजार 153 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुनरीक्षणात पुरुष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांची 7 हजार 827 ने अधिक नाव नोंदणी झाली. ही वाढ 2.27 टक्के आहे.
जिल्ह्यात साडे तीन लाखांवर युवा मतदार!
जिल्ह्यात एकूण मतदारांच्या तुलनेत युवा मतदारांची संख्या मोठी आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 26 हजार 616 होती. अंतिम मतदार यादीमध्ये 32 हजार 545 झाली आहे. एकूण 5 हजार 929 तरुण नवमतदारांची वाढ झाली आहे. ही वाढ 22 टक्के आहे. तर 30 ते 39 या वयोगटातील मतदारांची सर्वाधिक म्हणजेच 3 लाख 63 हजार 179 आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत आपला आमदार निवडण्यासाठी चाळीशीतील मतदारांचा मोठा वाटा राहणार आहे.
Nitin Gadkari : ‘स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कोसळला नसता’
असे आहेत मतदारसंघनिहाय मतदार!
जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 494 पुरूष, 1 लाख 46 हजार 968 महिला, इतर 4 असे एकूण 3 लाख 6 हजार 466 मतदार आहेत. तर बाळापूर मतदारसंघात 1 लाख 57 हजार 915, 1 लाख 48 हजार 590 स्त्री, एक इतर असे एकूण 3 लाख 6 हजार 506 मतदार आहेत. तर अकोला (पश्चिम) मध्ये 1 लाख 72 हजार 840 पुरूष, 1 लाख 72 हजार 587 स्त्री, 23 इतर असे एकूण 3 लाख 45 हजार 450 मतदारांची संख्या आहे. अकोला पूर्व मतदारसंघात 1 लाख 78 हजार 847 पुरूष, 1 लाख 71 हजार 331 स्त्री, 16 इतर असे एकूण 3 लाख 50 हजार 194 मतदार आहेत आणि मूर्तिजापूर मतदारसंघात 1 लाख 57 हजार 555 पुरूष, 1 लाख 49 हजार 291 स्त्री, 5 इतर असे एकूण 3 लाख 6 हजार 851 मतदार आहेत.