Amravati News : अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास चालू वर्षात मान्यता नाकारण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ही मान्यता देण्यास नकार दिला आहे. रिक्त जागा व अपुऱ्या यंत्रसामग्रीचा ठपका ठेवत अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास चालू वर्षात मान्यता नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नव्याने मंजुरीसाठी अमरावतीकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचाही तिढा कायम आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यात केलेल्या तपासणीनंतर मंजूर दहापैकी आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आली आहे. त्यामुळे त्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यासर्व कॉलेजच्या मान्ययतेसाठी आता पुढील वर्षी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे दहापैकी आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ सुरू होणार नाही. यावरून विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
तपासणीनंतर निर्णय
राज्यात दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास महायुती सरकारने मंजुरी प्रदान केली. गेल्या महिन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. यात प्राध्यापक, पायाभूत सुविधा आणि उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. काही महाविद्यालयांच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्या. अनेक महाविद्यालयांच्या इमारतींचे काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. प्राध्यापक, वसतिगृह, पुस्तके, फर्निचर आणि उपकरणे आणि ग्रंथालये उपलब्ध नव्हती. शिक्षक नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता नाकारण्यात आली.
अमरावतीचे महाविद्यालय तूर्तास जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये सुरू होणार होते. पण येथे प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या नव्हत्या. त्यामुळे अमरावतीच्या वाट्यालाही निराशा आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या या निर्णयाला आता आव्हान देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर नजीकच्या अलियाबाद (वडद) येथील जागा निवडण्यात आली आहे. अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांचा या जागेला विरोध आहे. ही जागा अमरावती शहरापासून 15 किलोमीटर दूर आहे. विद्यार्थी आणि रुग्णांसाठीदेखील ती गैरसोयीची आहे.
मागणी होतीच
अमरावती शहरातील महत्वाच्या भागात डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आहे. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरात असावे अशी मागणी आहे. विरोध असतानाही अलियाबाद (वडद) येथेच महाविद्यालयाची इमारत उभारली जाणार असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. हा भाग राणा यांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे या जागेसाठी ते आग्रही आहेत. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेय आणि जागेसाठी भांडण करण्यापेक्षा हे महाविद्यालय लवकरात लवकर कसे सुरू होऊ शकेल, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवे, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी केली आहे.