नागपूर शहरालगत बाह्य हिंगणा रिंग रोड जामठा येथे सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. हे कॅन्सर हॉस्पीटल नागपुरात झाल्यापासून सरकारी नोकरीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण येथे सरकारी कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे उपचार मोफत केले जातात. याच धर्तीवर रेशन दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबियांनाही एनसीआयमध्ये मोफत उपचार मिळावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या रेशन सेलचे अध्यक्ष उमाकांत उर्फ गुड्डू अग्रवाल सरसावले आहेत.
काय म्हणाले गुड्डू अग्रवाल
गुड्डू अग्रवाल यांनी लोकहितशी बोलताना सांगितले की, नॅशनल कॅन्सर इन्टिट्यूटमध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी उत्तम सुविधा आहेत. येथे उपचारासाठी गेलेला कर्करुग्ण बरा होऊन बाहेर निघण्याची शक्यता इतर रुग्णालयांपेक्षा अधिक आहे. येथे वेकोलि (Western Coalfields Limited), स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बीएसएनएल अशा १७ ते १७ सरकारी विभागांच्या अधिकारी, कर्मचार्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे निःशुल्क उपचार केले जातात. अगदी त्याचप्रमाणे रेशन दुकानदारांनी कोरोना काळात उत्तम काम केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या काळात दिलेल्या उत्तम सेवेबद्दल रेशन दुकानदारांचे कौतुक केलेले आहे.
कोरोना योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा एनसीआयसारख्या इस्पितळांमध्ये मोफत उपचार मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांना भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी बळ मिळेल, त्यांचा उत्साह वाढेल. कोरोना काळात अनेक रेशन दुकानदारांनी सेवा देताना प्राण गमावले आहेत. त्यामुळे एनसीआयसारखी सेवा मोफत मिळावी, हा त्यांचा हक्क आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने रेशन दुकानदार संघटनेच्या या मागणीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे गुड्डू अग्रवाल म्हणाले.
कर्करोग हा एक आजार आणि शास्त्रज्ञांसाठी एक आव्हान आहे. मानवजातीसाठी एक मोठे आरोग्य धोक्याचे संकट आहे. हे एक वैद्यकीय आव्हान आहे जे भौगोलिक, सामाजिक आर्थिक आणि वांशिक सीमा ओलांडते. कर्करोग हा बहुधा मानवजातीच्या इतिहासाइतकाच जुना आहे. या आजाराबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दलच्या आपल्या समजात लक्षणीय वैज्ञानिक प्रगती झाली आहे. त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण बरे होऊन जास्त काळ जगत आहेत.
मदतीचा हात देणे गरजेचे
बहुसंख्य रुग्ण अद्याप पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि या आजाराने मरत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने कर्करोगींना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मध्य भारतातील वैद्यकीय केंद्र असल्याने अशा सुविधांसाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त नागपुरकरांनाही मिळाला पाहिजे, असे गुड्डू अग्रवाल यांनी म्हटले आहे.