या लेखात प्रकाशित झालेली मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही
Shiv Sena : शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन गुरूवारी 19 जून रोजी पार पडला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी वर्धापन दिवसानिमित्त कार्यक्रम घेतला. लोकसभेचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दोन्ही सभा अत्यंत महत्वाच्या ठरल्या. शिवसेना (उबाठा) गटाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात तर शिवसेना ( शिंदे) गटाचा कार्यक्रम वरळी डोम येथे संपन्न झाला. या दोन्ही कार्यक्रमांमधून आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडल्या. एकमेकांची उणिदुणी काढली गेली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वार झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण, ठाणे, तसेच कोकणात उबाठा सेना साफ झाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे जनतेने दाखवून दिले आहे. आम्हाला मिळालेला विजय घासून पुसून नव्हे तर ठासून मिळाला आहे, अशी कोटी केली.
तर उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपसोबत कधीच जाणार नाही, असे ठणकावून सांगताना केंद्रातील सरकार पडलेच पाहिजे नव्हे ते पडणारच, असा दावा केला. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार पडून देशात मध्यावधी निवडणुका होतील, असाही दावा केला. दोन्ही शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये लोकसभेत विजेत्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेनेचे नाव, चिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखवा
मातेसमान शिवसेनेला फोडणाऱ्या नालायकांसोबत पुन्हा जाणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची फाटली आहे. त्यामुळे आपण एनडीए सोबत येणार अशा अफवा आणि गैरसमज पसरविण्यात येत आहेत, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांचा फोटो न लावता, शिवसेनेचे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह न लावता निवडणूक लढवून व जिंकून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिले.
शहरी नक्षलवादापेक्षाही भयंकर नक्षलवाद
आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक असतो. मोदींचा अहंकार मोठा आहे. मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. दमदाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही लोकांना पक्षांमध्ये घेता, सरकारं पाडता, पैशाचे लालच दाखवता हा शासकीय नक्षलवाद आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चांगली सरकारे फोडायचे आणि स्वतःच्या पक्षात घेऊन गद्दारांना मंत्रीपदे द्यायची, हा शहरी नक्षलवादा पेक्षाही भयंकर नक्षलवाद आहे, अशी टिकाही ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे, फडणवीसांवर टोलेबाजी
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नको म्हणून काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. उघड पाठिंबा म्हणजेच बिनशर्ट पाठिंबा, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. काही जण म्हणाले होते मी पुन्हा येईन. या निवडणुक निकालाने त्यांची अवस्था ‘मला जाऊ द्या ना घरी, वाजलेकी बारा’ अशी झाली आहे, अशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टिका केली.
मोदी ब्रँडची देशी ब्रँडी झाली : संजय राऊत
मेळाव्यात संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. यापूर्वी मोदी ब्रँड होता आता त्याची देशी ब्रँडी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना पक्षाने फिनीक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही, असेही ते म्हणाले.
उबाठा सेना काँग्रेसच्या दावणीला
उबाठा सेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. दोन वर्षांपूर्वी केलेला उठाव मतदारांनी सार्थ करून दाखवला. या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची ॲलर्जी
उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते, असा आरोप शिंदे यांनी केला. त्यांना बाळासाहेबांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
Prathbha Dhanorkar : येवढी ‘अंगार’ तर बाळूभाऊंनी पण नव्हती केली !
बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची. आज उद्धव ठाकरे यांनी हिंदू बांधव म्हणणे टाळले, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. कुठे गेल़े तुमचे हिंदुत्व, एवढी कसली लाचारी? असा सवाल त्यांनी ठाकरेंना विचारला.