महाराष्ट्र

BJP First List : पहिली यादी जाहीर ‘सेफ गेम’

Assembly Election : विदर्भातील अनेक आमदारांना पुन्हा संधी 

Maharashtra Politics : विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. रविवारी (20 ऑक्टोबर) दुपारी यादी जाहीर करण्याचा मुहूर्त भाजपने साधला. एकूण 99 उमेदवारांची ही पहिली यादी आहे. विदर्भातील 24 उमेदवारांची नावे भाजपनं यादीत घेतली आहे. त्यामध्ये 22 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना भाजपने अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे जाणवत आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत एकापाठोपाठ वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहे. महायुतीमधील जागा वाटपाचे काम पूर्ण झाले, असे सर्वच नेते सांगत होते. मात्र जागावाटप पूर्ण झाल्यानंतरही उमेदवारांची नावं का जाहीर केली जात नाही, असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांना विचारण्यात येत होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात भाष्य केले होते. लवकरच यादी जाहीर होईल असे फडणवीस नागपुरात म्हणाले होते.

विजयाचा विश्वास 

फडणवीस यांनी उमेदवारांच्या यादीबाबत भाष्य केल्यानंतर आता नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये अशा अनेक जागांचा समावेश आहे जिथे विजयाचा विश्वास नेत्यांना आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करताना ‘विनिंग सीट’ बाबत काळजी घेण्यात आली आहे. पहिलीच यादी असल्यामुळे सहाजिकच त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव असणे स्वाभाविक होते. अपेक्षाप्रमाणे ही तीन नावे पहिल्या यादीत आली आहेत.

नागपूर जिल्ह्यामध्ये फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासह पाच विद्यमान आमदारांना भाजपच्या निवडणूक समितीने पुन्हा संधी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संधी देण्यात आलेल्या आमदारांची संख्या तीन आहे. अकोला जिल्ह्यातून केवळ अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे नाव यादीत आहे. रणधीर सावरकर यांच्या बाबत भाजपला विजयाची खात्री आहे. याशिवाय अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये कोणताही वाद नाही. रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघात बऱ्यापैकी कामे केली आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपसाठी योगदान दिले. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होईल, असे ‘द लोकहित’ने नमूद केले होते.

अमरावती जिल्ह्यातून एका विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातून तीन विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी भाजपनं दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांनाही विधानसभेच्या निवडणूक रिंगणात पुन्हा उतरवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातून एक विद्यमान आमदार उमेदवारांच्या यादीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून दोन आमदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील आमदारांना निवडणुकीच्या रणसंग्रामात लढण्यासाठी भाजपने पाठवले आहे.

Assembly Election : ‘द लोकहित’चे वृत्त तंतोतत खरे ठरले; येरावार, उईके, सावरकर यांना संधी 

‘द लोकहित’चे वृत्त खरं ठरलं 

यवतमाळ जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके आणि यवतमाळचे आमदार मदन येरावार यांना उमेदवारी मिळेल, हे वृत्त सर्वप्रथम ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. याशिवाय यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान मंत्री संजय राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांना संधी मिळणार आहे. काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे आपले सुपुत्र जितेंद्र मोघे यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदारसंघात मात्र भाजप विद्यमान आमदाराच्या बाबतीत विचार करीत असल्याचे चित्र अद्यापही कायम आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!