Farmer Issue : राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण शेतकऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी वेळोवेळी निवेदने दिली. आंदोलने केली. पण फायदा होत झाला नाही. त्यामुळे सिंदखेडराजा येथील दोन शेतकऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मंजूर झाल्या नाही तर ३० सप्टेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी लेखी स्वरूपात शासनाला सुद्धा कळविले आहे.
सरकारची हलगर्जीपणा..
बुलढाणा जिल्ह्यात २०२४ करिता शेतकर्यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज केले. या अर्जाची लॉटरी निवड करण्यात आली. आणि पूर्वसंमती देऊन अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. तरीही सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांना ठिबक व तुषार मिळण्यास विलंब होत आहे. यासाठी शेतकरी दिलीप चौधरी व बालाजी सोसे यांनी २९ ऑगस्टला निवेदन दिले. परंतु, प्रशासनाने यावर कुठलीच कारवाई केली. त्यामुळे सिंदखेडराजा येथे ९ सप्टेंबर रोजी बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
या आहेत मागण्या
पाणी, खत, वीज, मजूर बचत करून शेतमालाचे अधिक व दर्जेदार उत्पादन यावे, म्हणून शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करीत आहे. केंद्र व राज्य सरकारद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जाते. शेतकर्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर्जाचे पैसे काढून गुंतवणूक केली. अनुदान मिळेल म्हणून ठिबक व तुषार संच खरेदी केलेले आहेत. परंतु शासनाने पूर्वसंमती देऊनही आजपर्यंत शेतकर्यांना अनुदान मिळालेले नाही. तसेच काही शेतकर्यांनी २०२४-२५ मध्ये नवीन अर्ज केलेले आहेत. या आर्थिक वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचनासाठी लॉटरी होऊन निवड झालेली नाही. ही योजना ठप्प आहे. तरी पूर्वसंमतीची प्रक्रिया पूर्ण करून द्यावी. त्याचप्रमाणे रद्द केलेल्या शेतकर्यांचा पीक विमा अर्ज रिअॅक्टिव करावे, व रद्द केलेल्या पिक विमा अर्जाचा सरसकट पिक विमा शेतकर्यांना मिळावा. तसेच ज्या मंडळांमध्ये राज्य सरकारने शेतकर्यांची नुकसान भरपाईची गारपीटीची मदत दिली त्या ठिकाणी सरसकट पिक विमा देण्यात यावा. या मागण्या दोन्ही शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
तत्काळ अनुदान द्या
ठिबक व तुषार सिंचनाचे २०२३-२०२४ मधील प्रलंबित अनुदान तात्काळ द्या. संपूर्ण सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना सरसकट पीकविमा द्या. नाहीतर ३० सप्टेंबरला आम्ही कुणाचेच काही ऐकणार नाही. आत्मदहन करू म्हणजे करूच, असा इशारा दिलीप चौधरी व बालाजी सोसे यांनी शासनाला दिला आहे.