Mumbai : अतिक्रमण कारवाईमुळे विशाळगड आणि परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आ. सतेज पाटील हे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावरून भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर तोफ डागली आहे.
एका बाजूला आपण छत्रपतींचा वारसा सांगता. दुसऱ्या बाजूला आपल्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत असेल तर त्याचे संरक्षण करायला जाता. हे दुर्दैव आहे. छत्रपती शाहू महाराज आता राजकीय झालेत. त्यांनी राजकीय पांघरूण ओढून घेतले आहे. सतेज पाटील यांच्या बरोबरीने ते राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत, अशी टीका दरेकरांनी केली आहे.
‘शाहू महाराज किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने मतदान केले. त्या समाजाशी इमानदार राहण्याचा ते प्रयत्न करताहेत हे स्पष्ट दिसतेय. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेली भुमिका योग्य आहे. गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होताच कामा नये. त्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. परंतु आता छत्रपती शाहू महाराज राजकीय झालेत,’ असे दरेकर म्हणाले.
जातीय तेढ निर्माण होत आहे
सरकारी पातळीवर एकत्रित बसून नियोजन होऊ शकते. दिशा मिळू शकते. परंतु प्रत्येकाला आपली राजकीय पोळी भाजायची आहे. त्यातून वातावरण गढूळ झाले काय, किंवा जातीय तेढ निर्माण झाली काय. विरोधकांना त्याचे काहीच पडलेले नाही, असेही दरेकर म्हणाले.
आव्हाड यांची बेताल बडबड
जितेंद्र आव्हाड बेताल बडबडण्यात माहीर आहेत. अजित पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा राग नाही. कारण ते शेवटी राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार, देवेंद्र फडणवीस काम करताहेत. त्यामुळे राग असण्याचे काही कारण नाही. जे बेताल बोलणारे आहेत त्यांना राग कुठून दिसला?
अजित पवारांनी तर स्पष्टपणे सांगितले शिंदेच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवणार आहे. राग असलेला माणूस असे बोलतो का?, असा सवाल दरेकरांनी केला.
त्या आमदारांचा राग पटोलेंवर
चार-पाच नव्हे तर १८ जणांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे प्रथम दर्शनी वाटतेय. कारवाई करण्याची काँग्रेसमध्ये आता हिंमत आहे का? त्या आमदारांनी आव्हान दिलेय की नाना पटोले अध्यक्ष असल्याने अनेक अडचणी निर्माण होताहेत. त्यांचा राग नाना पटोलेंवरच आहे. उद्या हे सर्व आमदार एकत्रित येऊन नाना पटोलेंनाच बदला, कारवाई करा अशी मागणी करतील तर आश्चर्य वाटायला नको, असे दरेकर म्हणाले.