Politics of Grampanchayat : गोंदिया जिल्हाच्या तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भैसारे नियमीतपणे ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने पदाधिकाऱ्याच्या कक्षाचे कुलूप न उघडता त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे उपसरपंच भैसारे यांनी थेट कार्यालयासमोरच ठिय्या मांडून ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रशासनाच्या असभ्य वागणुकीचा निषेध केला.
आपण दलित असल्यामुळे अशी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोपही भैसारे यांनी केला. या प्रकरणामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची भीती असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. ग्रामपंचायत डोंगरगाव येथे शुभम नरेंद्र भैसारे उपसरपंच आहेत. संवैधानिक व्यवस्थेत पदसिध्द पदाधिकारी असून त्यांना काही अधिकार मिळाले आहेत.
लाडकी बहिण या योजनेसह इतर वैयक्तिक योजनांच्या लाभासाठी आलेल्या लाभार्थ्यांना माहिती देण्याच्या अनुषंगाने भैसारे ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. दरम्यान कार्यरत पटले नावाच्या कर्मचाऱ्याला त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कक्षाचे कुलूप उघडण्यास सांगितले. मात्र संबधित कर्मचाऱ्याने कक्षाचे कुलूप उघडण्यास स्पष्ट नकार दिला. सरपंचानेच आपल्याला सांगितले असल्याचेही तो बोलला. विनंती केल्यानंतरही त्या कर्मचाऱ्याने उपसरपंच भैसारे यांच्यासाठी कक्षाचे कुलूप न उघडता त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला.
भेदभाव असल्याचा आरोप
या प्रकाराने संतापलेल्या भैसारे यांनी कक्षासमोर व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. ग्रामपंचायत प्रशासन जातीय भेदभावातून आपल्याला अधिकारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे प्रकरण त्यांनी चव्हाट्यावर आणले. एवढेच नव्हेतर भैसारे यांनी आपण दलित समाजाचे असल्यामुळे सरपंच व काही कर्मचारी आपल्याला संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
भैसारे यांनी या प्रकाराची तयार केलेली चित्रफित सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे डोंगरगाव/खडकी या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.दूसरीकडे प्रसिध्दीसाठी उपसरपंच स्टंटबाजी करत असल्याचे सरपंच पटले यांनी ‘द लोकहित’ला सांगितले. कोणत्याही पदाधिकाऱ्याला संवैधानिक हक्कापासून वंचित ठेवता येत नाही. हे सर्वश्रुत आहे.
उपसरपंच भैसारे हे अनेक प्रकरणातून प्रसिध्दी मिळविण्यासाठी अशाच प्रकारचे खोटे आरोप करीत असतात. घटनेच्या दिवशी जे घडले. त्यातील सत्य बाब काही वेगळीच आहे. योजनांच्या लाभासाठी महिला कार्यालयात येतात.
Maharashtra Assembly : ‘आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा’
घटनेच् यादिवशी कार्यरत कर्मचारी हा स्वच्छतेचे काम करीत होता. त्यामुळे भैसारे यांना थोडा वेळ बाहेर बसण्यासाठी व्यवस्थित खुर्ची दिली. मात्र आपलेच कक्ष उघडा, असा अट्टाहास धरून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे, असा आरोप सरपंच शिशुपाल पटले यांनी केला आहे.