Mahavikas Aghadi : ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. 3 डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी या विषयावर भूमिका मांडली नव्हती. जोपर्यंत आपल्याकडे ठोस माहिती येत नाही, तोपर्यंत ईव्हीएमवर आपण बोलणार नाही, असे ते म्हणाले होते. परंतु शनिवारी त्यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. त्याबाबत आम्हाला काही लोकांनी त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले होते. पण आम्ही विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे आमच्याही लक्षात आले आहे, असे पवार म्हणाले.
बैठकीकडे लक्ष
काँग्रेसकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. शेवटच्या दोन तासांत 76 लाख मतदान कसे वाढले, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. आता विरोधक काय भूमिका मांडतात? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचे निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता विरोधक काय करतात व काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मतदानासाठी इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचा (इव्हीएम) वापर करण्यावरून देशभरात सध्या मतमतांतरे दिसून येत आहेत. पराभूत पक्षांनी इव्हीएमवर आक्षेप नोंदवत पुन्हा जुनी मतपत्रिकेची पद्धत अवलंबण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील 2017 मध्ये निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने देशातील 55 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. यामध्ये 7 राष्ट्रीय पक्ष आणि 48 प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातील 16 पक्षांनी मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी केली. बैठकीच्या वेळी निवडणूक आयोगाने इव्हीएमवर सादरीकरण केले.
Congress : ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना मुनगंटीवारांनी धू धू धुतले..!
गैरप्रकार
त्यावेळी मतदान यंत्राला झालेला विरोध शांत झाला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. सध्या काँग्रेसकडून ईव्हीएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर गरज भासल्यास न्यायालयीन लढा लढण्याची तयारी देखील काँग्रेसने चालवली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.