Vikas Kumbhare : नागपूरमधील तीन मतदारसंघांमध्ये भाजपने आपले उमेदवार निश्चित केले. पहिल्या यादीत त्यांना स्थानही दिले. तिघेही विद्यमान आमदार आहेत. पण नागपूरमधील भाजपच्या चौथ्या विद्यमान आमदाराला सध्या होल्डवर ठेवण्यात आला आहे. दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पूर्व अशा तीन जागांसाठी विद्यमान आमदारांवरच विश्वास टाकण्यात आला. पण मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या मतदारसंघाचा पहिल्या यादीत समावेश नाही. त्यामुळे मध्यचा सस्पेंस आता विकास कुंभारेंसाठी ‘थ्रिलर’ ठरू लागला आहे.
उमेदवार बदलण्याचा आग्रह
मध्य नागपूर म्हणजे जुन्या नागपूरचा बहुतांश भाग होय. या भागात जवळपास सर्वच समाजाचे, धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या या भागात हलबा समाजाची सर्वाधिक मते आहेत. त्यामुळे हलबा समाजाचा उमेदवार उभा करण्यावर सर्वच पक्षांचा जोर असतो. हलबा समाजाचे नेतृत्व करणारे विकास कुंभारे गेली तीन टर्म मध्यचे आमदार आहेत. मात्र आता त्यांच्याबद्दल कमालीचा रोष असल्याचे भाजपचेच लोक म्हणत आहेत. त्यामुळे यावेळी उमेदवार बदलण्याचा आग्रह होऊ लागला.
अशात भाजपने नागपुरातील आपल्या तीन विद्यमान आमदारांना संधी दिली आणि एकाला होल्डवर ठेवले. त्यामुळे मध्य नागपूरचा उमेदवार बदलणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. विधानपरिषद सदस्य प्रवीण दटके यांनी मध्यची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. नागपुरात भाजपच्या सक्रीय नेत्यांपैकी ते एक आहेत. अर्थात जातीचे गणीत याठिकाणी बसत नाही. त्यामुळे हलबा सामजाचे माजी उपमहापौर दीपराज पारडीकर आणि महापालिकेचे स्थाई समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिसिकर यांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
प्रवीण दटकेंना लढायचीये विधानसभा
नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रवीण दटके मध्य नागपूरमधून लढण्यास इच्छुक आहेत. खरं तर ते सध्या विधानपरिषदेच्या निमित्ताने आमदार आहेतच. पण मध्य नागपुरातून लढण्याची त्यांची इच्छा यापूर्वीदेखील होती. 2019 मध्येच दटके यांनी जोर लावला होता. पण त्यात यश आले नाही. नंतर विधानपरिषदेवर घेऊन त्यांना शांत करण्यात आले. मात्र यंदा ते जिद्दीलाच पेटल्याचे बोलले जात आहे.
कुंभारेंचे काय चुकले?
विकास कुंभारे गेली पंधरा वर्षे मध्य नागपूरचे आमदार आहेत. हलबा समाजाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांच्यावर भाजपच्याच लोकांनी निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. कुंभारे यांचा इतर समाजांशी कनेक्ट कमी आहे, असा प्रचार भाजपच्याच लोकांनी केला. त्यामुळे गेल्याच निवडणुकीत कुंभारेंची उमेदवारी धोक्यात होती. मात्र, रिस्क घ्यायची नसल्याने भाजपने त्यांनाच संधी दिली.
काँग्रेसच्या उमेदवाराला मदत
विकास कुंभारे यांच्या विरोधात 2019 मध्ये काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कुंभारेंच्या विरोधात भाजपच्याच असंतुष्टांनी मतदान केल्याची चर्चा होती. परिणामी कुंभारे यांना 75 हजार 692 मतं पडली. तर बंटी शेळके यांना 71 हजार 684 मतं पडली होती. अवघ्या चार हजारांनी कुंभारे निवडून आले. मात्र यंदा त्यांच्यावर डाव खेळण्याची भाजपची तयारी नसल्याचे दिसते.