Rs 12 crore : भारतीय रेल्वेने जागतिक दर्जाच्या सुविधांचा दावा केला. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेची मोठी घोषणा केली. या योजनेत तुमसर रोड जंक्शनचा समावेश झाला आहे. असे असले तरीही येथे प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधाही मिळत नाहीत. विशेषतः महिला प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत कलश योजनेचा मूळ उद्देश राष्ट्रीय एकात्मता आणि प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा देणे हा होता. मात्र, तुमसर रोड स्थानकावर या योजनेचे अपयश स्पष्ट दिसून येत आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या तुमसर रोड जंक्शनवर महिलांसाठी उभारलेले प्रसाधनगृह एक वर्षापासून बंद आहे. स्वच्छतेसाठी महत्त्वाचे असलेले हे प्रसाधनगृह वापरण्यासाठी उघडण्यात आलेले नाही. महिलांना ही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून प्रसाधनगृह बंद ठेवण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही, जे अधिक चिंताजनक आहे.
12 कोटींचा निधी, तरीही विकासाचा अभाव
केंद्र सरकारने अमृत भारत योजनेतर्गत 12 कोटींचा निधी मंजूर केला. प्रतीक्षालय, प्लॅटफॉर्म सुधारणा आणि स्वच्छता यांसारख्या सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, वास्तविकतेत प्रतीक्षालय अपुरे आहे, स्वच्छतागृहे कुलूपबंद आहेत आणि विकासाची कामे कासवगतीने सुरू आहेत. यातून हा निधी योग्य पद्धतीने वापरण्यात आला का, हा प्रश्न उपस्थित होतो.
योजनेचं अपयश, विकासाचा दिखावा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत कलश योजनेचा उद्देश होता की, देशातील प्रत्येक कोपऱ्यातून माती गोळा करून ती राष्ट्राशी जोडावी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान व्हावा. त्याच धर्तीवर अमृत भारत स्थानक योजनेची घोषणा झाली. मात्र, तुमसर रोड स्थानकावर महिलांना मूलभूत सुविधा न दिल्यामुळे या योजनेचा खरा हेतू फोल ठरला आहे. यामुळे केंद्र सरकारने संकल्पित केलेला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा उद्देश येथे सपशेल अपयशी ठरला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..
तुमसर रोड स्थानकाच्या विकासासाठी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी विशेष समिती नेमली आहे. मात्र, या समितीच्या नियमित बैठका होऊनही महिला प्रसाधनगृह कुलूपबंद असल्याचा मुद्दा कधीच चर्चेत आला नाही. विशेषतः विभागीय व्यवस्थापक महिला असूनही, त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनीही या समस्यांवर आवाज उठवलेला नाही. निवडणुकीच्या प्रचारात विकासाचे गोडवे गाणारे नेते या ठिकाणी गप्प का आहेत, हा प्रश्न प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे. स्थानकाच्या मूलभूत सुधारणांसाठी राजकीय नेत्यांनी आवाज उठवला असता, तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता.
महिला सुरक्षेचा मुद्दा..
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. मात्र, हा मुद्दा फक्त घोषणांपुरता मर्यादित राहिलेला दिसतो. तुमसर रोड जंक्शनवरील समस्यांकडे दुर्लक्ष न करता प्रवाशांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. स्थानिक नागरी संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला जबाबदार ठरवले पाहिजे.
तुमसर रोड जंक्शनवर महिला प्रवाशांसाठी सुविधांचा अभाव, अमृत भारत योजनांचा फोलपणा उघड करणारा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पना प्रभावी असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी अपयशी ठरत असल्याने स्थानिक प्रशासन आणि नेत्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.