Shiv Sena : विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्षात इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीचे तलवारीने केक भरविण्याचे प्रकरण असो. किंवा पोलिसांकडून गाडी धुवून घेण्याचे ताजे प्रकरण असो. शिवाय जिजाऊंच्या जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव ठेवावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी केला आहेच. त्यामुळे त्यांची उमेदवारी तशीही धोक्यात आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यामुळं अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ गेल्या पाच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा गड राहिलेला आहे. बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड या मतदारसंघातून पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, आता याच मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा मतदारसंघ हा शिवसेनेने महिलांसाठी कायमस्वरुपी राखीव ठेवावा, अशी मागणी केली आहे. तसेच त्या दृष्टीने त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचीही माहिती माध्यमांना दिली आहे.
गायकवाडांचे टेंशन वाढले
पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तरीही प्रेमलता सोनवणे पाटील या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. प्रेमलता सोनवणे पाटील यांनी तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळं आता शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे टेंशन वाढले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रेमलता सोनवणे पाटील यांनी बंडाचे निशान फडकावलं आहे. त्यामुळं आता बुलढाणा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार? हा चर्चेचा विषय ठरत आहेत.
बंडखोरीचीही शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. इच्छुकांनी गाठीभेटी तयारी देखील सुरु केली आहे. अनेकजण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या दावा करत आहेत. त्यामुळं सर्वच पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तिकीटांचं वाटप करताना पक्षश्रेष्टींसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.
गायकवाड सुरुवातीपासूनच अडकले आहेत वादात
आमदार संजय गायकवाड सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कृतीवरून राजकीय वादळे उठते. वादंग निर्माण होतात. आमदार गायकवाड आणि वाद असे समीकरणच मागील दोन वर्षांपासून तयार झाले आहे. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण ते वेगळ्या आणि तितक्याच गंभीर कारणाने. गुरुवारी वादंगाचे मूळ ठरले त्यांचे शाही वाहन आणि सुरक्षा रक्षक पोलीस. गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांचे वाहन धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आणि विरोधकांनी पुन्हा एकदा रान पेटवलं आहे.