Vidarbha Politics : लोकसभेचा निकाल लागला आणि नवनिर्वाचित खासदारांनी विजयाचा जल्लोशही थाटात केला. आता लवकरच देशाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि नवे खासदार कामाला लागतील. मात्र या सर्वांत आता त्यांच्यावर स्थानिक मतदारसंघात दिलेली आश्वासने आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे आव्हान असणार आहे. अकोल्यात पाचव्यांदा विजय पटकावणाऱ्या भाजपने यंदा युवा खासदार अनूप धोत्रेंकडे अकोलेकरांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी दिली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातून अनूप धोत्रे यांच्या विजयात स्थानिक तरुणांचे मोठे योगदान असल्याचे दिसून आले. तरुण खासदार मिळाल्याने आता युवकांच्या त्यांच्याकडून अपेक्षादेखील वाढलेल्या आहेत. आता पुढे हाच प्रश्न असणार की युवा धोत्रे तरुणांच्या अपेक्षांचा भार कितपत वाहून नेतात. पहिल्यांदाच अकोला लोकसभा मतदारसंघात युवा खासदाराला मतदारांनी निवडून दिले आहे. मतदारांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. आता या युवा मतदारांना नव्या खासदारांकडून अनेक अपेक्षा आहेत.
जिल्ह्यात युवकांचे अनेक प्रश्न आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या किरकोळ संधी उपलब्ध झाल्या आहेत. खाजगी नोकरीत युवकांना चांगले पगार मिळत नाहीत. त्यामुळे उच्चशिक्षित असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीसाठी मुंबई, पुणेसारख्या शहरांत स्थलांतरित व्हावे लागते. जिल्ह्यात व्यापक स्वरूपात रोजगारनिर्मिती होण्याची गरज आहे. त्यासाठी नवे खासदार नक्कीच पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आहे. कारण ते स्वतः युवा आहेत. त्यामुळे त्यांना युवकांच्या प्रश्नांची जाण असावी, असे युवकांना वाटते.
उद्योगांना चालना देण्याची गरज..
अकोला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात नव्या उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कोणताही नवा मोठा उद्योग सुरू झाला नाही. कोणताही नवा प्रकल्प नाही. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लघु व सूक्ष्म मिळून एक हजार 670 उद्योग आहेत. पाच वर्षांत उद्योगांमध्ये वाढ झाली असली तरी अनेक उद्योग बंदही पडले आहेत. अकोला एमआयडीसीमधील ऑइल, दाल मिलमधून डाळ व तेलाचा देशभरात पुरवठा होतो. आगामी काळात यावर भर दिल्यास उद्योग वाढीला चालना मिळू शकते.
विमानतळाचा प्रश्न रखडलेलाच..
अकोल्यात असलेल्या ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराचा प्रश्न गेल्या दीड दशकांपासून रखडलेलाच आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी विमान सेवेची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा मार्ग रखडलेला आहे. अनेकदा प्रयत्न झाले मात्र अपयशी ठरले. आता नवीन खासदार याकडे लक्ष देतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘कॉटन सिटी’ ओळख पुन्हा मिळेल का?
अकोला जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचे. म्हणून या शहराची ओळख कॉटन सिटी अशी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही ओळख पुसटशी झाली आहे. कापसापासून कापड करण्यासाठी कोणताच प्रकल्प येथे नाही. अकोला जिल्ह्यात कापूस ते कापड निर्मितीचा मोठा उद्योग नसल्याने कापूस बाहेर पाठवला जातो. राज्यातील चार कृषी विद्यापीठांपैकी एक कृषी विद्यापीठ अकोल्यात आहे. मात्र त्याचाही शेतकऱ्यांना फार फायदा होतो असे नाही. शेतमालावर प्रक्रिया उद्योगाचा अभाव, गुलाबी बोंडअळी आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निम्म्यावर शेतकरी हे सोयाबीनकडे वळले. जिल्ह्यात विविध कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातात. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे मतदारसंघात कृषी प्रक्रिया उद्योगाला वाव आहे.
अकोला मॉडेल रेल्वे स्थानकाच्या प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विदर्भातील अकोला हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. ब्रॉडगेज आणि पूर्वीच्या मीटरगेज लोहमार्गावरील अकोला मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने अकोल्यात मॉडेल रेल्वे स्थानकाची घोषणा काही वर्षांपूर्वी केली गेली होती. त्यामुळे मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावर अकोला जंक्शन रेल्वे स्थानक, जिल्ह्यात जाणारे राष्ट्रीय महामार्ग आदी उद्योग वाढीसाठी पोषक आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.