‘Diary of a Home Minister : तशी तर तुरुंगात उंदरं खूप होती. सतत इकडून तिकडे बिनधास्त फिरत राहायची. पण तिथे एक जरा जास्तच धीट उंदीर होता. सगळे त्याला ‘टरबुज्या’ म्हणायचे. त्याला काडी मारून दूर हाकलले, की पहिले तो सरपटत पळायचा. मग पुढे गेल्यावर एका जागी थांबून मागे वळून बघायचा. त्याची नजर इतकी भेदक होती की जणूकाही ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’… असेच तो आम्हाला ओरडून सांगतोय’… हा मजकूर आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकातील. रविवारी सकाळीच देशमुख यांनी ‘एक्स’वर हा मजकूर प्रकाशित केला आहे.
उत्सुकता वाढवली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाने चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. विशेष म्हणजे यातील काही मजकूर खुद्द अनिल देशमुख यांनीच त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे या संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे स्पष्ट झालं आहे. शिवाय त्यांनी रविवारी सकाळीच आणखी एक पोस्ट केली. त्यामुळे त्यांनी ‘जेलमधील उंदरं म्हणायची… मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असा उल्लेख केला आहे.
अनिल देशमुख यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर आपल्या भाषणांमधून अनेकदा तेथील अनुभवांचे कथन केले आहे. मात्र बऱ्याच गोष्टी त्यांनी पुस्तकासाठी थांबवून ठेवल्या. 14 महिन्यांचा त्यांचा अनुभव ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत. या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे.
देशमुख काय म्हणाले?
या पुस्तकातील पटकथेचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत, असे त्यांनी शनिवारी सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळीच त्यांनी आणखी काही मजकूर प्रसिद्ध केला. ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘टरबूज’ : मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला लवकरच कळेल. माझे ‘थ्रिलर’ आत्मचरित्र ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’च्या 16व्या आणि 20व्या अध्यायातील काही उतारे इथे शेअर करत आहे. ही फक्त एक झलक आहे. पुस्तकात एवढे खळबळजनक खुलासे आहेत की ते टरबूज फोडल्याशिवाय राहणार नाहीत.’