Cm Devendra Fadnavis : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं. पण मंत्रिमंडळात कोण असणार, यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणती खाती कुणाकडे असतील यावरच चर्चा सुरू आहे. पण, दुसरीकडे फडणवीस यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागपुरातील कार्यकर्त्यांची निराशा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर आगमनाच्या तारखा सातत्याने बदलत असल्यामुळे अखेर ‘कवा येता जी देवाभाऊ?’ असा खास नागपुरी सवाल उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 2014 ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि 2 नोव्हेंबर 2014 ला ते नागपुरात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत प्रचंड गर्दी होती. यंदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सात दिवस उलटले तरीही ते अद्याप नागपुरात आलेले नाहीत. त्यांच्या नागपूर आगमनाच्या तारखा सातत्याने बदलत आहेत. विशेष म्हणजे 12 डिसेंबरला येणार म्हणून कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. पण त्यानंतर सातत्याने तारखा बदलत असल्यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह मावळताना दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न सोडवायचा असल्यामुळे नागपूर आगमनाला वेळ लागणार, हे माहिती होते. 2014 मध्ये फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या मंत्र्यांचाही शपथविधी झाला होता. यंदा भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन पक्षांचा सत्तेत समावेश आहे. त्यामुळे केवळ भाजप नव्हे तर इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीत भाजप 22, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 10 पदे द्यायचे ठरलेले असले तरीही कुणाच्या वाट्याला मंत्रीपद येणार, याबाबत चर्चा सुरू आहे.
आगमनाच्या तारखांचा लपंडाव
या संपूर्ण परिस्थितीत फडणवीस यांचे गपूर आगमन लांबत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नागपूर आगमनासाठी त्यांचे चाहते, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सुरुवातीला 12 डिसेंबर हा दिवस निश्चित होता. त्यासंदर्भातील सूचनाही नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, ऐनवेळी 12 ऐवजी 13 डिसेंबरला येणार असल्याचा निरोप आला. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने काही सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यात स्वागत कमानींची उंची 20 फुटांपेक्षा जास्त ठेवा, मुख्यमंत्र्यांना कुठलीही मिठाई थेट खायला देऊ नका, गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी करू नका किंवा फटाके फोडू नका. अशा सूचना देखील सर्वांना देण्यात आल्या.
Vijay Wadettiwar : पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आंदोलन पेटले!
16 पासून अधिवेशन; 15 ला आगमन
बुधवारी, (दि. 11 डिसेंबर) फडणवीस यांचे माजी मानद सचिव संदीप जोशी यांनी एक प्रेस नोट जारी केली. यात मुख्यमंत्र्यांचे नागपूर आगमन आता 15 डिसेंबरला होणार आहे, असे सांगण्यात आले आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ घातले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे आगमन तसेही होणारच होते. दुपारी 12 वाजता फडणवीस यांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर त्यांची स्वागत यात्रा जल्लोषात निघेल. विशेष म्हणजे आता त्यांच्या आगमनाच्या तारखेचा लपंडाव होणार नाही, हे निश्चित आहे.