प्रशासन

ST Bus ‘लालपरी’ची चाके थांबताच 15 कोटी रुपयांचे नुकसान!

strike : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर ठाम!

Maharashtra Government : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होऊन फार तर चोवीस तास झाले असतील. एव्हाना या संपामुळे राज्य सरकारचा 15 कोटी रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने लालपरीची चाके थांबली आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे 50 टक्के बस सेवा ठप्प झाली होती. यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात तब्बल 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

प्रवाशांचे हाल 

ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारवर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. ऐन गणेशोत्सवाचा काळ आहे. त्यामुळे मोठं नुकसान महामंडळाचे झालं आहे. सलग दुसऱ्या दिवशीही एसटीच्या संपावर कर्मचारी ठाम आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ लागू करावी, वेतनवाढीच्या 4हजार 849 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप करावी, सेवाज्येष्ठ कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करावी, सरसकट 5 हजार द्यावे, वैद्यकीय सेवेसाठी कॅशलेश योजना कामगारांना लागू करण्यात यावी आणि कर्मचारी व कुटुंबीयांना एसटीत फरक न करता मोफत पास सवलत द्यावी. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा एसटी बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल 14 ते 15 कोटी रुपयाचं एकाच दिवसांत एसटीचे नुकसान झालं आहे.

असा बसला फटका!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांच्या कृती समितीने 3 सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे 50 टक्के बस सेवा ठप्प झाली. राज्यातील एकूण 251 आगारांपैकी 59 आगारांमध्ये पूर्णत: काम बंद आंदोलन करण्यात आले. तर 77 आगारे अंशतः बंद होती. या कारणानं राज्यात बसच्या एकूण 11 हजार 943 फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी महामंडळावर ओढवली. यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात तब्बल 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक!

3 सप्टेंबरला एसटी कामगार संघटनेच्या कृती समितीची मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोडगा न निघाल्याने बैठक फिसकटली. तर दुसरीकडे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृति समितीची बैठक आहे. या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सहानुभूतीपूर्वक विचार करावा – वडेट्टीवार

एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य प्रवाशांचाही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आणि संप लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावरून हे सरकार कुठल्याच पद्धतीचे काम करत नाही असे चित्र दिसते आहे. हे सरकार काम करत असेल तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळच का यावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले,अशी टीकाही त्यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!