BJP Vs Congress : मतदानाचा दिवस नागपूर मध्य मतदारसंघात अत्यंत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ दिवस ठरला. या दिवसाचा अस्त भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दटके यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नातून झाला. दटके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय आहेत. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे ते उमेदवारही आहेत. त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाला सुरुवात झाली, तेव्हापासून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके हे आक्रमक दिसले. भारतीय जनता पार्टीच्या ‘व्होटर स्लिप’ काही मतदान केंद्रामध्ये सापडल्यानंतर शेळके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काही मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा वाद निवळल्यानंतर नागपूर शहर पोलिसांनी काही भागांमध्ये लोखंडी कठडे उभारत नाकाबंदी केली. त्यानंतर वादाचा नवा अध्याय सुरू झाला.
पोलिसांशी हुज्जत
नागपूर पोलिसांनी ज्या भागांमध्ये नाकाबंदी केली होती, त्या भागामध्ये बंटी शेळके काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह दाखल झालेत. पोलिसांनी नाकाबंदी करत एका विशिष्ट समाजातील मतदारांना अडवण्यास सुरुवात केल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला. वाद वाढल्याने पोलिस उपायुक्तसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बंटी शेळके यांचा पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसोबतही वाद झाला. अखेर बंटी शेळके यांनी पोलिसांना हे लोखंडी कठडे काढण्यास भाग पाडले.
लोखंडी कठड्यांचा मुद्दा संपल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून बंटी शेळके यांचे समर्थक पैसे वाटत असल्याचा आरोप झाला. माहिती मिळताच निवडणूक विभागाचे पथक बंटी शेळके यांच्या परिसरात दाखल झाले. पथकाने काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आपल्या कार्यकर्त्याविरुद्ध खोटा आरोप करण्यात आल्याचं स्पष्टीकरण बंटी शेळके यांनी दिलं. त्यानंतर तणावात आणखी भर पडली.
Priyanka Gandhi : संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भीडले
दिवसभर सुरू असलेल्या या तणातणीत मतदानाची वेळ संपली. मतदान आटोपल्यानंतर भाजपचे उमेदवार तथा आमदार प्रविण दटके हे महाल भागातून जात असताना त्यांच्या वाहनाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलं. काँग्रेसचे कार्यकर्ते दटके यांच्यासमोर आल्यानंतर मध्य नागपुरातील भाजपचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर राड्याला सुरुवात झाली. भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू असताना आमदार प्रविण दटके यांनाही धक्काबुक्की झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बळाचा वापर
काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भीडल्यानंतर प्रचंड मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आमदार प्रविण दटके यांना सुरक्षा प्रदान केली. त्यानंतरही काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आपसात भीडले. त्यामुळं पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगविले. या घटनेनंतर मध्य नागपुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या भागातील बंदोबस्त आता वाढविला
मध्य नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आमदार प्रविण दटके भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी दिली आहे. शेळके यांनी दटके यांच्या कार्यालयात घुसत प्रचार केला होता. दटकेंच्या अनेक समर्थकांनी त्यांना ‘विजयी भव:’ असा आशीर्वादही दिला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. गेल्या तीन वर्षांपासून बंटी शेळके मध्य नागपुरात जनसंपर्क वाढवित होते. कोविड काळपासून त्यांनी प्रत्येक घराघरात जात आपलं नेटवर्क तयार केलं. त्यामुळं भाजपसमोर या मतदारसंघात शेळके यांनी तगडं आव्हान उभं केलं.
रोड-शोमध्येही राडा
मतदानाच्या काही तासांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी नागपुरात रोड-शो केला. रोड-शो सुरू असताना देखील महाल परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी देखील पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. सर्व परिस्थिती कायम असताना मतदान संपल्यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. त्यामुळे मध्य नागपुरात निर्माण झालेला हा राजकीय तणाव अगदी सहज निवळेल असं सध्या तरी दिसत नाही.
या वादाप्रकरणी आता पोलिस कोणाविरुद्ध कारवाईtr करतात याची चर्चा उपराजधानी नागपुरात सुरू आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा बालेकिल्ला आहे. याच भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील आहे. त्यामुळे प्रवीण दटके यांच्यासाठी या मतदारसंघातून विजय मिळविणे अत्यंत गरजेचे झालं आहे. मध्य नागपुरातील मतदारांनी कोणाला कौल दिला हे 23 नोव्हेंबरचा सूर्य सांगेल.