Maharashtra Politics : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकात ईव्हीएम घेऊन जाणारी वाहनं अडविल्यानं राडा झाल्याचा दावा भाजपचे उमेदवार तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रवीण दटके यांनी दिली. मध्य नागपुरात काँग्रेस आणि भाजपच्या उमदेवारांमध्ये राडा झाल्याच्या मुद्द्यावर आमदार दटके यांनी ‘द लोकहित’शी संवाद साधला. दटके म्हणाले की, मतदानाच्या दिवशी सुरुवातीपासूनच काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आणि कार्यकर्ते निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करीत होते. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
मतदान आटोपल्यानंतर बडकस चौकात काही लोकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्याच वेळी ईव्हीएम घेऊन जाणारी सरकारी वाहनं चौकात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही वाहनं अडविण्याचा प्रयत्न केला. निवडणूक विभागाची वाहने अडवून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणारे अधिकारी, पथकातील कर्मचारी आणि चालकाशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याठिकाणी होतो. कोणतीही तक्रार असल्यास निवडणूक आयोगाकडं तक्रार करावी, असं आपण त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप आमदार दटके यांनी केला.
पोलिसही हतबल
बडकस चौकात सलग दोन दिवस राडा झाल्यानं मध्य नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड-शो नागपुरात झाला. रोड-शो बडकस चौकात आला त्यावेळीही तणाव निर्माण झाला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. त्यावेळीही पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. त्यानंतरही मतदानाच्या दिवशी मध्य नागपुरात प्रचंड तणावाची परिस्थिती होती. पायाला भिंगरी लावत काँग्रेसचे बंटी शेळके अनेक मतदान केंद्रावर जात होते.
भाजपचे चिन्ह असलेल्या ‘व्होटर स्लिप’ मतदान केंद्रात आढळल्यानं शेळके यांनी अधिकाऱ्यांचा चांगलच धारेवर धरलं. त्यानंतर एका भागात पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतरही शेळके यांनी आक्षेप घेतला. त्यावेळीही शळके यांचा पोलिसांशी चांगलाच वाद झाला. मतदान आटोपल्यानंतर ईव्हीएम सरकारी वाहनातून नेण्यात येत असताना बडकस चौकात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जमावानं वाहनं अडविली, असं दटके म्हणाले.
यासंदर्भातील अनेक व्हिडीओही सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यात संतप्त जमाव बडकस चौकात वाहनं अडविताना दिसतो. आणखी काही व्हिडीओ मध्ये काँग्रेस कार्यकर्ते आमदार दटके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करताना दिसतात. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळं पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. घटनेनंतर पोलिसांना बळाचा वापर करीत जमावाला पांगवावे लागले. त्यानंतरही तणावाची स्थिती कायम होती. सध्या पोलिसांनी या भागातील बंदोबस्तात वाढ केली आहे. गस्तही वाढविण्यात आली आहे.