महाराष्ट्र

Lok Sabha Election : न विचारता काँग्रेसला पाठिंबा भोवणार; तैलिक महासंघाची तक्रार

Chandrapur Constituency : आमदार प्रतिभा धानोरकर यांना केले होते निमंत्रित 

Political News : सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला बोलावून काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून घेण्याचा चंद्रपुरातील प्रकार काँग्रेसच्या अंगलट येणार आहे. काँग्रेसचे सूर्यकांत खनके यांनी श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूरचे अध्यक्ष अशोक झोडे व सचिव यशवंत बोंबले यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून, तेली समाज जिल्हा चंद्रपूर, अशी नोंदणीकृत संघटना नसताना तेली समाजाचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी केली आहे.

बनावट संस्था तयार करून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांना समस्त तेली समाजाचा पाठिंबा खनके यांनी जाहीर केला आहे. काँग्रेस उमेदवाराने रसद पुरविल्यानेच खनके यांनी हा खेळ खेळला. या प्रकरणाची निवडणूक आयोग व पोलिसात तक्रार करणार आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जातप्रमाणपत्र तपासा, अशी मागणीही करणार असल्याचे देवतळे यांनी जाहीर केले आहे.

नेमका प्रकार काय?

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसला पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा होताच उपस्थित समाजबांधवांनी त्याला चांगलाच विरोध केला होता. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे दिसताच लोकांचा पारा आणखी चढला होता.

तेली समाजाचा हा कार्यक्रम ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला होता. तेली युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ तथा तेली समाजाच्या इतर संघटनांच्या वतीने तुकुमच्या मातोश्री सभागृहात हा सत्कार व सामाजिक मेळावा घेतला होता. उल्लेखनिय कामगिरीसाठी सुभाष रघाताटे, ॲड.केतन खनके व कवडू लोहकरे यांच्या सत्काराचे औचित्य साधत काँग्रेस सेवादल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.

तेली समाजाच्या सर्व बंधू भगिनींना केवळ सत्कार सोहळा असल्याचे सांगत निमंत्रण देवून एकत्रित आणण्यात आले. याच कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांना निमंत्रित केले गेले. सत्काराचा कार्यक्रम सुरळीत सुरू होता. अशातच काँग्रेसच्या काही समर्थकांनी धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला. सेवादलचे खनके यांनी तेली समाजाच्यावतीने तशी घोषणा केली. त्यामुळे वाद आणखीच भडकला. यावेळी तेली समाजाच्या काही मंडळींनी खनके यांना घेराव करून धक्काबुक्की केली.

Lok Sabha Election : प्रतिभा धानोरकर दिसताच कार्यक्रमात उडाला गोंधळ

तेली समाजातील अनेकांनी या घटनेची समाज माध्यमावर निषेध व्यक्त करण्यात आला होता. केवळ सत्कार व समाज मेळाव्याचे निमंत्रण देत ऐनवेळी प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न केविलवाणा असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटली होती. आता या प्रकाराची तक्रार पोलिस आणि निवडणूक आयोगाकडे होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!