Lok shabha Election : निवडणूक म्हटले की, अनेकांच्या अंगावर शहारे उठतात, ते म्हणजे गावोगावी गल्ली बोळातून फिरणा-या प्रचार वाहनावरील भोंग्याने. डोकं भंडावून सोडणारे गाणे आणि उमेदवारांचे एकामागून येणारे प्रचार रथ. त्यातच आता प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचण्याचे साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते. त्यामुळे आता उमेदवार रेकॉर्डेड कॉल करुन मतदारांना भंडावून सोडत आहेत.
रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आता मतदारांना फोन करून रेकॉर्डिंग संदेशाद्वारे प्रचार सभा, ठिकाण, उपस्थित नेते, वेळ, निवडणूक चिन्ह आदी बाबींची माहिती दिली जात आहे. त्यामुळे एकाच वेळी फोनद्वारे हजारो मतदारांपर्यंत माहिती पोहोचत आहे.
चौथ्या टप्प्यात जळगाव व रावेर मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असल्याने नेत्यांच्या सभांबरोबर रोड शो दुचाकी रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठीभेटींमुळे प्रचाराला जोर येत आहे. राजकीय पक्षांकडून पारंपरिक प्रचार यंत्रणाबरोबरच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर होत आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी थेट फोन कॉलचा वापर होत आहे. ‘हॅलो मी अमुक उमेदवार बोलत आहे, आमच्या पार्टीला मतं द्या! आमच्या पक्षाने असं कामं करून सामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
असे अनेक फोन कॉल सामान्य मतदारांना त्रास देताहेत. स्थानिक मुद्दे सोडून, देश पातळीवरील मुद्दे सांगत मतदारांचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न या कॉलव्दारे केला जात आहे. कामात असलेला, वाहन चालवित असलेला मतदार मोबाईल कॉल आल्याने थांबून कॉल उचलतो, परंतु उमेदवाराचा कॉल असल्याचे समजताच, मनातल्या मनात शिव्या देत कॉल कट करतो, हे तेवढेच खरे.
‘सोशल मीडियावर’ दिला जातोय भर
पूर्वी हाताने रंगवलेले बॅनर, सायकल, बैलगाडीवरून प्रचार केला जात होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट, इंस्टाग्राम रिल्स टाकणे, व्हॉट्सअप, एक्स, फेसबुकवर पोस्ट, व्हिडीओ, पोस्टर टाकून सोशल मीडियातून प्रचार केला जात आहे. त्यात राजकीय पक्षाचे मराठी गाणी व डिजीटल व्हॅनद्वारे पक्षाची भूमिका, कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून मतदाराला आपल्या बाजूने मत देण्यासाठी प्रोत्साहित केले जातआहे.
Lok Sabha Election : शेतकऱ्यांचे नाही शरद पवार कारखानदारांचे नेते
निवडणूक आयोगाची करडी नजर !
निवडणूक आयोगाने सर्व नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रकाशन किंवा प्रसारणापूर्वी मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व-प्रमाणपत्र घेणे आधीच बंधनकारक केले आहे. आता निवडणुकीच्या काळात मतदारांना अशा मोठ्या प्रमाणात एसएमएसच्या सामग्रीचे “निरीक्षण” करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे “जेणेकरुन आक्षेपार्ह सामग्री या माध्यमातून प्रसारित होणार नाही”.
“या वैशिष्ट्याचा (बल्क एसएमएस) काहीवेळा राजकीय प्रचारात दुर्भावनापूर्ण आणि अपमानास्पद सामग्री पाठवण्यासाठी आणि त्याद्वारे निवडणूक आणि गुन्हेगारी कायदे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यासाठी देखील गैरवापर केला जाऊ शकतो. ,त्यासाठी निवडणूक आयोगानेआदेशात म्हटले आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये, निवडणूक आयोगाने पोलिसांना मोठ्या प्रमाणात एसएमएस आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये त्यांचा समावेश करण्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
उमेदवारांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट प्रचार सामग्रीच्या प्रती मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) च्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे आणि त्यांचे आयडी/खाते फेसबुक , ट्विटर आणि यूट्यूब सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर उघड करणे आवश्यक आहे.