महाराष्ट्र

Assembly Elections : सावरकर म्हणतात, ‘तुझसे नाराज नहीं’!

BJP Politics : उमेदवारी नाकारल्याचा धक्का; बावनकुळेंचा प्रचार करणार

भाजपने पहिली यादी जाहीर केली. कामठी मतदारसंघाचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी प्रामाणिकपणे बावनकुळेंचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. पण तरीही ‘तुझसे नाराज नहीं… हैराण हूँ मै’ अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी नाराजी नसल्याचे म्हटले आहे. पण, उमेदवारी नाकारली जाईल, असे त्यांना मुळीच अपेक्षित नव्हते.

फारशी चर्चा नसताना चंद्रशेखर बावनकुळे यांना परत कामठीतून उमेदवारी देण्यात आली. या निर्णयानंतर सावरकर यांच्या मनात निश्चितच खंत निर्माण झाली आहे. मात्र मी नाराज नसून पक्षाने जो निर्णय घेतला तो योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बावनकुळेंचा पूर्ण वेळ प्रचार करण्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात ऐनवेळी बावनकुळेंना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांना धक्का बसला आहे. भाजपला कामठीत विजयाची खात्री नसल्यामुळे बावनकुळेंना पुन्हा मैदानात उतरविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कामठी येथून 2019 साली नाट्यमयरीत्या बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. त्यामुळे ते निवडणूक लढतील की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र केंद्रीय भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बावनकुळे यांना कामठीतून लढण्याची सूचना करण्यात आली. त्यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीरदेखील करण्यात आले.

सावरकर यांचे पाच वर्षांतील काम जेमतेम होते. त्यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुतांश प्रकल्प आणले. त्यामुळे त्यांना स्वतः केलेल्या कामांचा प्रचार करणे तसे कठीणच होते, अशीही चर्चा आहे. त्यातही काही दिवसांअगोदर त्यांची जीभ घसरली व ‘लाडकी बहीण’ योजना ‘जुगाड’ असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य फार व्हायरल झाले होते. पक्षनेतृत्वाने याची दखल घेतली होती. याचादेखील फटका सावरकर यांना बसला. आता तिकीट गेल्यानंतर सावरकर यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र बावनकुळे यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्यानेच सावरकर यांना उभे करण्यात आले होते. त्यामुळे सावरकर पक्षाच्या विरोधात जाणार नसल्याचे निश्चित आहे.

Assembly Elections : सावरकर म्हणतात, ‘तुझसे नाराज नहीं’!

कार्यकर्ते नाराज होणारच

‘पक्षाने जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे. मी प्रामाणिकपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रचार करणार. काही समर्थक कार्यकर्त्यांना नाराजी वाटत आहे. मात्र ते साहजिकच आहे. कुणाचेही तिकीट कापले की त्याला खंत वाटतेच. मात्र दोन दिवसांत सर्व समर्थक परिस्थिती समजून परत कामाला लागतील,’ असं सावरकर म्हणाले.

परतफेड करण्याची संधी

2019 मध्ये बावनकुळे यांचे तिकीट नाकारले तेव्हा ते कमालीचे नाराज झाले होते. दरम्यान त्यांच्याऐवजी तेली समाजाचाच उमेदवार देण्यात आला. बावनकुळेंची समजूत घालण्यात आली. त्यानंतर बावनकुळे स्वतःच सावरकर यांच्यासाठी मैदानात उतरले. आता तशीच परिस्थिती सावरकर यांच्यावर आहे. त्यांना परतफेड करण्याची संधी आहे, अशी चर्चा होत आहे.

जीवाचं रान करेन

‘मला पक्षाने खूप काही दिले आहे. आता मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी दु:ख करणे योग्य नाही. माझी मात्र कुठलीही नाराजी नाही व कामठीतून भाजप प्रदेशाध्यक्षांना निवडून आणण्यासाठीच जीवाचे रान करू,’ अशी भूमिका सावरकर यांनी मांडली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!