EVM News : मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने अमरावतीत गोंधळ होत आहे. अचलपूर येथील सिटी हायस्कूल, अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्या शाळेत ईव्हीएम बंद पडले. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास 361 जणांचे मतदान झाल्यानंतर अचलपूर येथे मतदान यंत्रात बिघाड झाला. दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास मतदार यंत्र बदलविण्यात आले.
बेगमपुरा येथील नगर परिषदेच्या शाळेतही मतदान यंत्रात बिघाड झाला. ऑनलाइन यादीत मतदारांचे नाव होते. प्रत्यक्षात मतदानकेंद्रावर नव्हते. भलत्याच मतदानकेंद्रावर नाव ट्रान्सफर झाल्याचे प्रकारही घडले. विदर्भ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर खोली शोधण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला, अशी तक्रार मतदारांनी केली.
काहीही होऊ शकते
ईव्हीएम बंद होणे, हे एक षडयंत्र आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. काही वेळातच काही जागांवर ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. यावर राऊत यांनी टीका केली. ईव्हीएम बंद पाडणे हे वारंवार होत राहिल. वर्धा, अमरावतीमध्ये हे प्रकार जास्त होतील. अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य घडण्याची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ईव्हीएम बंद पडतील. मतदारांना खोळंबायला लावले जाईल. हा एक षडयंत्राचा भाग आहे, असे राऊत म्हणाले.
संध्याकाळनंतर ईव्हीएम चालू होतात आणि मतदान सुरळीत होते. जो मतदार सकाळीच मतदान करण्यासाठी येतो, त्याला नाउमेद केले जाते. निवडणूक आयोगात मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे. अमित शहा रामलल्लाचे दर्शन मोफत करू हे सांगताना हा आयोग कुठे होता? असे राऊत म्हणाले. जय भवानी, जय शिवाजी यावर आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे. मात्र रामलल्ला, जय बजरंगबली चालते’, असा टोला राऊतांनी लगावला.
समजण्यासाठी 50 वर्षे लागतील
राहुल गांधी समजदार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. एखाद्याला समजदार होण्यासाठी 52 वर्ष लागतात हे पुरेसे आहे. एखाद्या व्यक्तीला समजदार होण्यासाठी 52 वर्ष लागत असतील तर त्याविषयी मी काय बोलू? अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. ते बदलले जाणार नाही, असे राणा म्हणाल्या.