बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक विविध क्लुप्त्या वापरून आपल्यासाठी सोयीस्कर बदली मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आता काही नवीन राहिलेले नाही. मात्र, यंदा काही शिक्षकांनी दुर्धर आजाराचे खोटे प्रमाणपत्र सादर करून बदली प्रक्रियेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये पाठविण्यात येत नाही. मात्र, याच नियमाचा गैरफायदा घेत काही शिक्षकांनी सुरक्षित ठिकाणी बदलीसाठी खोट्या आजाराचे प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळले आहे.
शासनाच्या नियमानुसार, दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांना त्यांच्या आजाराच्या स्वरूपानुसार सवलत दिली जाते. परंतु, काही शिक्षकांनी खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेत आपल्यासाठी सुरक्षित आणि मुख्यालयाच्या जवळच्या शाळांमध्ये बदली मिळवली आहे. काही शिक्षकांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठीही अशाच प्रकारे सोयीस्कर ठिकाणी बदली मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिक्षकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रक्रियेचा गैरफायदा घेतला. अनेक ठिकाणी अडचणीची शाळा सोडून सुरक्षित शाळांमध्ये जागा अडवून ठेवली आहे.
गेल्या बदली प्रक्रियेतही प्रकार उघड..
मागील बदली प्रक्रियेदरम्यानही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आली होती. त्यावेळी काही दक्ष नागरिकांनी याबाबत आवाज उठवला. त्याची वरिष्ठांकडे चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान, सादर केलेली डॉक्टरांची प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली. परिणामी, अशा शिक्षकांना “सस्पेशियस” यादीत समाविष्ट करून त्यांच्या प्रस्तावांची दखल घेतली गेली नाही.
या वर्षीही प्रकार सुरूच..
यंदा पुन्हा संवर्ग-1 मधील बदली प्रक्रियेदरम्यान, काही शिक्षकांनी डॉक्टरांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून अवघड क्षेत्रात जाणे टाळण्याचा प्रयत्न केला आहे. एन्जीओप्लास्टीसारख्या आजारांचे खोटे दाखले सादर करत काही शिक्षकांनी स्वतःसाठी सोयीची बदली मिळवण्याचा डाव रचला आहे. यामुळे बदली प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
बदली प्रक्रिया सुधारण्यासाठी उपायांची गरज..
शासनाने बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडून येणारी प्रमाणपत्रे तपासण्याकरिता स्वतंत्र समिती नेमणे, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबवणे आणि खोटे दाखले सादर करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे, हे उपाय आवश्यक ठरतील. याशिवाय, अशा प्रकरणांमुळे खरोखरच आजारी असलेल्या शिक्षकांना योग्य सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची काळजी घेतली जावी. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करणे अनिवार्य झाले आहे.